मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
नंदीवाले तिरमली जातपंचायतीचा कथित फतवा; दंड, मारहाण व सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याचा आरोप

Kopargaon vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६ : तालुक्यातील धामोरी येथील नंदीवाले तिरमली समाजातील एका कुटुंबाला मुलीने जातीतीलच युवकासोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून जातपंचायतीने कथितरीत्या सामाजिक बहिष्कृत केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जातपंचायतीने कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याचा, त्यापैकी ५० हजार रुपये वसूल केल्याचा तसेच दंडाची उर्वरित रक्कम न दिल्याने कुटुंबाला मारहाण व सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या सज्ञान मुलीने आपल्या समाजातीलच एका युवकासोबत प्रेमविवाह केला. मात्र, हा विवाह समाजाच्या नियमांविरुद्ध असल्याचे सांगत जातपंचायतीने तो अमान्य केल्याचे अहिरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यानंतर धामोरी येथे जातपंचायत भरवून अहिरे कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही कुटुंबाने कर्ज काढून ५० हजार रुपये जातपंचायतीला दिले. उर्वरित रक्कम देणे शक्य न झाल्याने कुटुंबाचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

पीडित कुटुंब सुया-फण्या विकून पालामध्ये राहून उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगण्यात आले. दंडाची रक्कम पूर्ण न दिल्याने कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्याशी कोणीही बोलू नये, सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांना बोलावू नये, अन्यथा संबंधितांनाही दंड करून जातीबाहेर काढण्यात येईल, असा कथित फतवा जातपंचायतीने काढल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

या सामाजिक बहिष्कारामुळे अहिरे कुटुंबाला अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांपासूनही दूर ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर जातपंचायतीच्या कथित निर्णयामुळे आनंदा अहिरे यांना स्वतःच्या भावाच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीशीही भेटू दिले जात नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
या प्रकाराबाबत पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि कोपरगाव अंनिसचे अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडित कुटुंबीयांना सोबत घेऊन कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देत सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार संबंधित जातपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.




