प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्स्पो २०२५ चा शुभांरभ
प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्स्पो २०२५ चा शुभांरभ
प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्स्पो २०२५ चा शुभांरभ
राहाता विजय कापसे दि १० ऑक्टोबर २०२५–थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली संकल्पनेवर आधारित बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी बिझनेस एक्स्पो २०२५ चा शुभांरभ शिक्षणाच्या पंढरीत यावर्षी पुन्हा एकदा झाला. सलग दुस-या वर्षी विद्यार्थ्यांच्या सहभागाने १८० स्टॉलची उभारणी करण्यात आली असून, खरेदीसाठी पहिल्याच दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या बिझनेस एक्स्पोमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्टॉल उभारण्याची संधी देवून त्यांच्यातील व्यवसायीक संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बिझनेस एक्स्पो पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट देवून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतूक केले आहे.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार, कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य त्याचबरोबर पाणी प्रश्नावर जे विशेष काम केले. सहकाराच्या माध्यमातून परिसरातच नव्हे तर ग्रामीण भागाचं एक आदर्श मॉडेल त्यांच्या माध्यमातून उभे राहिले त्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून याच प्रदर्शनाच्या प्रथमदर्शनी नदीजोड प्रकल्प आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या माध्यमातून उभा राहिलेला ग्रामीण भारत साकारण्याचा उत्कृष्ट प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे हे मॉडेलही लक्षवेधी ठरले आहे.

शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तुंच्या विक्रीसाठी अतिशय उत्साहीपणे थाटलेला व्यवसाय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सकाळपासूनच या बिझनेस एक्स्पोला भेट देण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक स्टॉलवर वस्तू खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साहही दिसून आला.

संस्थेमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना व्यवसायिक कौशल्याचे ज्ञान मिळावे यासाठी या बिझनेस एक्स्पोची सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांच्या सहभागाने १ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहाता ही उलाढाल अधिक वाढेल असा अंदाज संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केला.
या बिझनेस एक्सपो मध्ये शेती क्षेत्रामध्ये नव्याने होणारे बदल, प्रक्रिया उद्योग, कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असणारे बी बियाणे खते शेती तंञज्ञान, विविध प्रकारची भाजीपाला आणि फळांची आणि शोभेच्या झाडांची रोपे,ई बाईक, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारतासाठी ही संकल्पना पुढे नेत बांबू पासून तयार केलेल्या विविध वस्तू, हस्तकला, मधुमक्षिका पालन जनजागृती, सेंद्रिय खत, पर्यावरण पूरक वस्तू त्याचबरोबर दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या पणत्या आकाश कंदील यासह संस्थेतील विद्यार्थींनींनी खास तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल ग्राहकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.



