बँका, पतसंस्था अन् एटीएमच्या सुरक्षेसाठी कोपरगाव ग्रामीण पोलिसांचा पुढाकार

बँका, पतसंस्था अन् एटीएमच्या सुरक्षेसाठी कोपरगाव ग्रामीण पोलिसांचा पुढाकार
सीसीटीव्ही, अलार्म सिस्टीम अन् सायबर फसवणूक प्रतिबंधाबाबत व्यवस्थापकांना मार्गदर्शन; ४० ते ५० प्रतिनिधींची उपस्थिती

Kopargaon vijay kapse दि १७ ऑक्टोबर २०२६–बँका, पतसंस्था आणि एटीएममधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बँका, पतसंस्था आणि एटीएमच्या व्यवस्थापकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सुरक्षा उपाययोजना, सीसीटीव्ही यंत्रणा, अलार्म सिस्टीम आणि सायबर फसवणूक रोखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

दुपारी १२.१५ ते १ वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध बँका, पतसंस्था आणि एटीएमचे सुमारे ४० ते ५० व्यवस्थापक उपस्थित होते. बँकांच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, एटीएममध्ये आधुनिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवणे आणि आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी बँका व पतसंस्थांच्या परिसरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सीसीटीव्ही फुटेज किमान ९० दिवस जतन करणे, एटीएममध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवणे आणि अलार्म सिस्टीम कार्यान्वित असल्याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या. एटीएमच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे बसविणे, संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि रोख रकमेची वाहतूक करताना योग्य ती खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले.

एटीएममध्ये कार्ड स्किमर, पिनहोल कॅमेरे किंवा अन्य संशयास्पद उपकरणे बसविलेली नाहीत ना, याची नियमित तपासणी करण्यावर विशेष भर देण्यात आला. एटीएममध्ये अनोळखी व्यक्तींकडून संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बँक व्यवस्थापनाने सतर्क राहून आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
सायबर फसवणूक रोखण्यासाठी जनजागृतीवर भर
सध्याच्या काळात ऑनलाइन व्यवहार, एटीएम कार्ड आणि विविध डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटना लक्षात घेता, बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एटीएमचा पिन, ओटीपी, बँक खात्याची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, तसेच संशयास्पद फोन, संदेश आणि लिंकपासून सावध राहावे, याबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
बँका, पतसंस्था आणि एटीएम व्यवस्थापनाने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
एटीएम सुरक्षेसाठी पोलिसांच्या महत्त्वाच्या सूचना
एटीएममध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
सीसीटीव्ही फुटेज किमान ९० दिवस जतन करावे.
अलार्म व सुरक्षा यंत्रणा कायम कार्यान्वित ठेवावी.
एटीएमची नियमित तपासणी करावी.
संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.
सायबर फसवणुकीबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करावी.
संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.



