संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये ‘रस्ता सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन
संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये ‘रस्ता सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन
रस्ता सुरक्षा’ हा जीवनाचा अविभाज्य भाग – डेप्युटी आरटीओ अनंता जोशी
कोपरगांव विजय कापसे दि ९ जानेवारी २०२५-: देशात मागील वर्षी सुमारे १, ७८,००० लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. हे प्रमाण जगाच्या तुलनेच्या १३ टक्के अधिक आहे. यात सुमारे एक लाख लोक हे १८ ते ४५ वयोगटातील होते. अपघात मुख्यत्वे तीन कारणांमुळे होतात. यात वाहन नादुरूस्त असणे, रस्त्यांमधिल खड्डे आणि वळणे आणि वाहन चालकांचा निष्काळजीपणा ही अपघाताची मुख्य कारणे आहेत. यातील वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे ७२ टक्के अपघात झाले. एखादा कमावता व्यक्ती अपघाताने मृत्युमुखी पडल्याने ते कुटूंब उघड्यावर पडते. या बाबीचे गांभिर्य लक्षात घेता ‘रस्ता सुरक्षा’ ला जीवनाचा अविभाज्य भाग समजावे, असे प्रतिपादन श्रीरामपुर परिवहन कार्यालयाचे उप परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले.
देशात पाळल्या जात असलेल्या रस्ता सुरक्षा महिण्याच्या निमित्ताने संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाने ‘स्टडंटस् असोसिएशन ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरींग’ अंतर्गत रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजीत केले होते. यावेळी श्री जोशी प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीरामपुर कार्यालयाचेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अतुल गावडे व श्रीमती राणी सोनवणे, प्राचार्य ए. आर. मिरीकर व विभाग प्रमुख प्रा. जी.एन. वट्टमवार उपस्थित होते.
श्री जोशी म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांनी वयाचे १८ वर्षे पुर्ण केले आहे, अशांनी वाहन चालक परवाना मिळवुन वाहन चालविले पाहीजे. तसेच आपल्या संपर्कातील लोकांचेही वाहने चालविण्या संदर्भात विविध नियमांची व काळजींची जागृती विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन केले. चालक परवाना नसेल तर कलम १८१ नुसार रू ५००० चा दंड होतो. मागील वर्षी देशात ४ लाख ८१ हजार अपघात झाले.यात वाहन नादुरूस्तीमुळे ३. २५ टक्के अपघात झाले. म्हणुन प्रवासापुर्वी आपले वाहन व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. रस्ते खराबीमुळे व अवघड वळणाच्या रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण ६. ५ ते ७ टक्यांपर्यंत होते. अतिवेगामुळे होणारे अपघातात ७३ टक्के लोक दगावले. म्हणुन रोड अवस्थेनुसार वेगावर मर्यादा असावी. चुकीच्या दिशेने वाहन चालविल्यामुळे सुमारे ४. ५ 5 टक्के अपघात झाले.तसेच नशा करून वाहन चालवु नये असे त्यांनी आवर्जुन सांगीतले. आपण परदेशात गेल्यावर सर्व नियम पाळतो,परंतु भारतात तसे होताना दिसत नाही. चार चाकी वाहनात सिट बेल्ट लावला आणि दुचाकी चालविताना हेलमेटचा वापर केल्यास कोणत्याही व्यक्तीची अपघातामुळे दगावण्याची शक्यता नसतेच. संजीवनीमध्ये सर्वच दुचाकीस्वारांना हेलमेट सक्तीचे केल्याबध्दल त्यांनी व्यवस्थापनाचे कौतुक केले.
कोणाचा अपघात झाला आणि आपण जवळ असलो तर अपघातग्रस्त व्यक्तिस एक तासाच्या आत जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास त्या व्यक्तीस १०० टक्के जीवदान मिळते. तसेच प्रत्येक हॉस्पिटलला अपग्रस्तावर अग्रक्रमाने उपचार करणे बंधनकारक आहे. जी व्यक्ती मदतीला धावते, त्या व्यक्तीला पोलीस विभागकडून कोणताही त्रास होत नाही, उलट अशा व्यक्तीस शासनाकडून रू ५० हजाराचे बक्षिस देण्याची तरतुद आहे. अशा अनेक बाबींवर आपल्या खास मनोरंजक शैलीत श्री जोशी यांनी मार्गदर्शन करून सर्वांचेच सुरक्षेबाबत लक्ष वेधले.
तर संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या उक्रमाचे कौतुक केले.