शिर्डीत आयात निर्यात कार्यालय सुरू करावे-भाऊसाहेब वाघ
शिर्डीत आयात निर्यात कार्यालय सुरू करावे-भाऊसाहेब वाघ
शिर्डीत आयात निर्यात कार्यालय सुरू करावे-भाऊसाहेब वाघ
कोपरगाव विजय कापसे दि १८ जानेवारी २०२५– शिर्डी हे जगविख्यात शहर असून या शहरात साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील हजारो भाविक भक्त येत असतात या भक्तांच्या सोयीसाठी शासनाने तसेच श्री साईबाबा संस्थानने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेतच परंतु त्यासोबतच व्यापारी व्यावसायिक व शेतकऱ्यांचा विचार करत आयात निर्यात कार्यालय देखील शिर्डी परिसरात सुरू करावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील नारंदी ऍग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांनी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.
नुकताच अहिल्यानगर जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र इन्फोटेक सपोर्ट मिशन अंतर्गत अहिल्यानगर येथे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली आयात निर्यातीवर भव्य चर्चा सत्र संपन्न झाले. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या निर्यात विभागाचे कमिशनर दिपेंद्र सिंग कुशावह, जनरल मॅनेजर अतुल दवंगे, जॉईन डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज नाशिक विभागाचे एस.बी सोने आदिसह अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आयात निर्यात या विषयावर अनेक तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर भाऊसाहेब वाघ यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, शिर्डी हे जगविख्यात शहर असून या शहरात रस्ते व रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहेच त्यासोबत विमानसेवेने देखील जोर धरला आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने परिपूर्ण असे शहर म्हणून शिर्डीची ओळख निर्माण झाली आहे. याच पायाभूत सुविधांचा विचार करत शिर्डी नजीक मोठी औद्योगिक वसाहत देखील उभी राहत आहे त्यामुळे देश-विदेशातील अनेक लहान मोठे व्यवसायिक शिर्डीत येणार आहे त्यांना आपल्या व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल आयात करणे निर्यात करणे आवश्यक असेल तसेच या भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल देखील देश विदेशात निर्यात करून त्याद्वारे शेतकऱ्यांना देखील अधिकचा लाभ होऊ शकतो त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करत शिर्डी येथे शासनाने आयात निर्यात कार्यालय कार्यान्वित करावे अशी मागणी नारंदी ऍग्रोचे भाऊसाहेब वाघ यांनी या चर्चासत्रात जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे केली आहे.