महामार्गावरील वृक्षांना पाणी देण्याचा थोरात कारखान्याचा स्तुत्य उपक्रम

महामार्गावरील वृक्षांना पाणी देण्याचा थोरात कारखान्याचा स्तुत्य उपक्रम
भर उन्हाळ्यामध्ये इंजी.कॉलेज ते बस स्थानक रस्त्यावरील झाडांना पाणी

Sangmner vijay kapse दि २६ मे २०२६– महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुका हा विकासातून वैभवशाली ठरला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आदर्शवत बनवलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या लक्ष्मी रोडवरील विविध झाडांना भर उन्हाळ्यात सातत्याने पाणी देण्याचा थोरात कारखान्याचा हा उपक्रम अत्यंत आदर्शवत ठरत आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या 84 व्या वर्षी पर्यावरण संवर्धनाची दंडकारण्य अभियान ही लोक चळवळ उभी केली. यामधून संगमनेर तालुका व शहरांमध्ये हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन करण्यात आले. तालुक्यातील अनेक उघडी बोडके डोंगर आता हिरवी दिसू लागली आहे. संगमनेर शहरात विविध गार्डन बरोबर रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा हॅप्पी हायवे आत्ताचा लक्ष्मी रोड हा शहराच्या वैभवात भर टाकणारा ठरणारा असून या रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर मध्ये असलेली विविध वृक्ष रंगीबेरंगी फुलझाडे यामुळे हा रस्ता अत्यंत सुंदर दिसत आहे. या वृक्षांना जगवण्याची व पाणी देण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने प्रशासनाची आहे मात्र प्रशासनाकडून याबाबत अत्यंत उदासीनता दिसून आली आहे. यामुळे या विविध वृक्षांना व फुलझाडांना जगण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दररोज पाणी दिले जात आहे. भर उन्हाळ्यात वृक्ष जगवण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक आणि अत्यंत स्तुत्य ठरणारा आहे.

याबाबत कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या वतीने दररोज अग्निशामनद्वारे या वृक्षांना दररोज मोफत पाणी दिले जात आहे. कारखाना सातत्याने वृक्षरोपण व संवर्धनासाठी काम करत आहे. या रस्त्यावरील विविध शोभेची झाडे व फुलांची झाडे यामुळे हा रस्ता अत्यंत सुंदर दिसत उन्हाळ्यामध्ये झाडांना पाण्याची अत्यंत गरज असल्याने कारखान्याच्या वतीने सातत्याने पाणी दिले जात असल्याचे ते म्हणाले.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या या उपक्रमाचे सर्व वृक्षप्रेमींकडून व शहरवासीयांकडून अभिनंदन होत आहे.
नागरिकांनी वृक्ष तोडणाऱ्या विकृत प्रवृत्तींना रोखावे – दुर्गाताई तांबे
संगमनेर शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले जात आहे. तालुक्यामध्ये ही अनेक ठिकाणी वृक्षारोपण झाले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात येणाऱ्या चारही बाजूने रस्त्यांचे चौपदरीकरण झाले असून या रस्त्यांच्या डिव्हायडर मध्ये वृक्षांचे रोपण केले आहे. मात्र काही विकृत प्रवृत्ती रस्त्यांवरील झाडे मोडून टाकण्याचा प्रकार करत आहे. तालुक्यात काही ठिकाणी डोंगरांना आगी लावल्या जात आहे. पर्यावरण संवर्धनात कोणीही राजकारण करू नये उलट झाडे मोडणाऱ्या जर अशा प्रवृत्ती कोणाला आढळल्या तर तातडीने नगरपालिका व पोलीस प्रशासनाला कळवावे तसेच वृक्ष संवर्धन प्रत्येकाने करावे असे आवाहन दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी नागरिकांना केले आहे.





