तिळवणीसह प्राथमिक आरोग्य केंद्रास १.५० कोटी; येसगाव, धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना मंजुरीबरोबरच १.११ कोटी निधी मंजूर

तिळवणीसह प्राथमिक आरोग्य केंद्रास १.५० कोटी; येसगाव, धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना मंजुरीबरोबरच १.११ कोटी निधी मंजूर
तिळवणीसह प्राथमिक आरोग्य केंद्रास १.५० कोटी; येसगाव, धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना मंजुरीबरोबरच १.११ कोटी निधी मंजूर

कोपरगाव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२५ :- कोपरगाव मतदार संघाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोपरगाव शहरात २८.८४ कोटी निधीतून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्याच गावात प्राथमिक आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशातून करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून यापूर्वी मंजुरी मिळविलेल्या तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला १.५० कोटी निधी मंजूर केला आहे. तसेच मतदार संघातील येसगाव व धारणगाव या गावात नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना महायुती शासनाने मंजुरी देवून या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना प्रत्येकी ५५.५० लक्ष याप्रमाणे १.११ कोटी असा एकूण २.६१ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात नागरिकांना समर्थपणे आरोग्य सेवा देत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या गावातच सुटण्यास मदत होत आहे. यापूर्वी अनेक गावातील नागरिकांना मध्यवर्ती गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविली जात होती. त्यामुळे सहाजिकच या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आरोग्य सेवा पुरवतांना येणारा ताण दूर करण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची संख्या वाढवून नागरिकांना आपल्याच गावात किंवा शेजारच्या गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची व उपकेंद्रांची संख्या वाढविण्यावर आ.आशुतोष काळे यांनी भर दिला.

त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून मागील पंचवार्षिक मध्ये माहेगाव देशमुख येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी मिळावी यासाठी केलेल्या पाठ्पुराव्यातून तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास महायुती शासनाकडून मंजुरी मिळविली होती. त्याचबरोबर येसगाव व धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळावी यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्यातून महायुती शासनाने तिळवणी प्राथमिक केंद्रासाठी १.५० कोटी व येसगाव आणि धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना देखील मंजुरी देवून १.११ कोटी निधी मंजूर केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे आरोग्य सेवा प्रदान करण्याचे प्राथमिक ठिकाण असल्यामुळे नागरीकांना आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.या केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवेच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्यामुळे लहान-मोठ्या आरोग्य समस्यांचे निदान व उपचार, लसीकरण, माता संवर्धन,बालसंवर्धन आणि नियमित आरोग्य तपासणी यांचा समावेश असल्यामुळे नागरिकांची आरोग्य व्यवस्था सांभाळण्यात मोठी मदत होते हे वैश्विक कोविडच्या महामारीत नागरिकांनी अनुभवले आहे. त्यामुळे भविष्यात अशा अचानकपणे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळवून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नव्याने मतदार संघातील तिळवणी प्राथमिक केंद्राबरोबरच येसगाव व धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना महायुती शासनाकडून एकूण २.६१ कोटी निधी मिळवीण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघ आरोग्यसेवेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, आरोग्य मंत्री ना.प्रकाशजी आबिटकर, राज्यमंत्री श्रीम.मेघनाजी बोर्डीकर यांचे आभार मानले आहे.