७२ वर्षीय आजींचा एकविराच्या क्रिकेटमध्ये जलवा; हातात बॅट घेऊन तरुणींना दिला आरोग्याचा मंत्र

एकविरा क्रीडा महोत्सवाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

संगमनेर विजय कापसे दि ११ मार्च २०२६– आनंदी जीवन जगण्यासाठी वयाचे बंधन नसते. आनंद आणि उत्साह हा सर्व आजारांवर मोठे औषध आहे. डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या एकविरा क्रीडा महोत्सवात राजापूर येथील 72 वर्षीय आजीने क्रिकेटच्या मैदानात उतरत फलंदाजी आणि गोलंदाजी करून महिला व युवतींना तणावमुक्त जीवन व चांगल्या आरोग्याचा मंत्र दिला आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवात चौथ्या दिवशी सहेली ग्रुप राजापूर संघाचे 72 वर्षीय अंजनाबाई बाबुराव शिंदे या आजीने नेतृत्व केले. आजीला पाहताच सर्व तरुणी व महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. एकविरा फाउंडेशनची कॅप डोक्यावर घालत आजी टॉस उडवण्यासाठी मैदानात आल्या. याचबरोबर सर्व महिलांना प्रोत्साहित केले.यावेळी कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात उपस्थित होत्या.

आनंदी जीवन जगण्यासाठी वयाचे बंधन नसते. चांगला आहार व्यायाम आणि शांत झोप महत्त्वाचे असून महिलांनी सातत्याने उपक्रमशील राहिले पाहिजे. आजार आपोआप दूर पळून जाईल असा सल्ला त्यांनी दिला. याचबरोबर प्रथम फलंदाजीसाठी उतरताना आजीने दोन चौकारांसह 12 धावा केल्या. पूर्णवेळ क्षेत्ररक्षण केले. आजीचा सहभाग आणि उत्साह यामुळे सहेली राजापूर ग्रुपने सलग दोन मॅचेस जिंकल्या.फलंदाजी बरोबरच गोलंदाजी मध्ये ही आजीने कमाल केली.दोन बळी सुद्धा घेतले.यानंतर दोन मॅचेस जिंकल्यानंतर आजीने डॉ.जयश्रीताई थोरात व सर्व महिलांसोबत झुंबा डान्स मध्ये सुद्धा सहभाग घेतला.

याप्रसंगी बोलताना 72 वर्षी आजी सौ.अंजनाबाई शिंदे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम बनवला आहे. या तालुक्यात कोणतीही कमी नाही. आपला माणूस राज्य पातळीवर काम करतो हा सगळ्या महिला भगिनींना अभिमान आहे. त्यांनी सर्व सुख सुविधा निर्माण करून दिल्या. मुली शिक्षणातून पुढे जात आहे.डॉ.जयश्रीताई थोरात यांनी महिलांच्या आरोग्यासाठी काम केले. डॉ.जयश्रीताई अत्यंत गुणवान मुलगी आहे. वडिलांप्रमाणे नम्र स्वभाव आणि सर्वांना समजावून घेत आहे. शहर आणि ग्रामीण भागात अत्यंत चांगलं काम डॉ.जयश्रीताई करत आहे. महिलांना कष्ट असतात मात्र त्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. फळे भाज्या खा, भाजी भाकरी खा, निवांत झोपा, काम तुम्ही करतच असता परंतु मन शांत ठेवा. तुम्हाला कोणताही आजार होणार नाही असा सल्ला त्यांनी महिलांना दिला.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने चौथ्या वर्षीच्या या मॅचेस सुरू आहे. यामध्ये सुमारे 5500 महिलांचा सहभाग आहे. दिवसेंदिवस महिलांचा सहभाग वाढत आहे हे आनंददायी आहे. महिलांनी कुटुंबाबरोबर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आणि याबाबत एकविराच्या माध्यमातून काम होत आहे.या स्पर्धांमुळे अनेक महिलांना नवीन मैत्रिणी जोडल्या आहेत.
महिला व युवतींचा उदंड प्रतिसाद
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात सुरू असलेल्या एकविरा फाउंडेशनच्या क्रीडा महोत्सवात संगमनेर तालुक्यातील मुली युवती व महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. 160 क्रिकेट संघ व 252 रस्सीखेच आणि 327 बॅडमिंटन संघ असून प्रेक्षक असणाऱ्या महिलांची ही मोठी उपस्थिती आहे. मधून मधून होणाऱ्या झुम्बा डान्स मध्ये खेळाडूंसह प्रेक्षक सहभागी होत असून या आनंदमयी सोहळ्याला महिलांची मोठी उपस्थिती लाभली आहे.








