सांप्रदायिक संस्कार वाढीसाठी प्रयत्न : कृष्णप्रिया वारकरी शिक्षण संस्थेचा उपक्रम
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ३ मे २०२५ : तालुक्यातील वारी येथील कृष्णप्रिया वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प. सुरेखाताई महाराज टेके यांच्या संकल्पनेतून वारीसह पंचक्रोशीतील आठ ते अठरा वयोगटातील बालकांसाठी 3 ते 17 मे दरम्यान पंधरा दिवसीय बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे शनिवारी (दि.3) मान्यवरांच्या हस्ते पखवाद, पेटी, टाळ, मृदुंग यांचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले आहे.
जाहिरात
या 15 दिवसीय शिबिरामध्ये उपस्थित बालकांना गायन, वादन, गीतापाठ, हरिपाठ, प्राणायाम, योगासने, कीर्तन, प्रवचन, सुसंस्कार, वारकरी संप्रदायातील पावल्या आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे शिबिर निवासी असणार आहे. यामध्ये पहाटे साडेपाच वाजता प्राणायाम, योगासने त्यानंतर गीतापाठ, गायन प्रशिक्षण. सायंकाळी 4 ते 6 पखवाद हार्मोनियम प्रशिक्षण, 6 ते 7 हरिपाठ व 8 ते 10 या वेळेत भजनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेवटचे तीन दिवस कीर्तन महोत्सवाचे ही आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सांप्रदायिक क्षेत्रातील नामवंत महाराज मंडळी देखील भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.जाहिरात
या शिबिराच्या उद्घाटनासाठी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सचिव पत्रकार रोहित टेके, ह.भ.प. मच्छिंद्र टेके महाराज, ह.भ.प. विनायक टेके महाराज, शिवसेनेचे मधुकर टेके, रमेश आहेर, शिरसाठ वस्ती शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती कांबळे, शिक्षक अविनाश खरात, आस्तिक टेके, संदीप काळे, संस्थेच्या अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प. सुरेखाताई महाराज टेके, सोमनाथ भाकरे, नितीन जगताप, मंदाबाई लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पालकांसह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनायक महाराज टेके यांनी मानले.