काका, मला ‘कलेक्टर’ व्हायचंय!
काका, मला ‘कलेक्टर’ व्हायचंय!
काका, मला ‘कलेक्टर’ व्हायचंय!
कोपरगाव विजय कापसे दि १८ मे २०२५– ‘ती’ वेदना घेऊनच जन्मली. जन्मजात अपंगत्व तिच्या वाट्याला आलं. हात आणि पायांत नैसर्गिक बळ नाही. आधारा-विना उभ राहणं शक्य नाही. शारिरीक वेदना पाचवीला पुजलेली. तिच्या मनात अभ्यासाची पालवी फुटली. आधी कोकमठाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत, नंतर कोपरगावच्या कन्या विद्यालयात तिनं धडे गिरवले. आईनं पाठीवर उचलून घ्यायचं. कन्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वर्गात नेऊन बसवायचं. शाळा सुटल्यावर पुन्हा तोच क्रम. ऊन असो वा वारा तिनं अभ्यासाचा ध्यास सोडला नाही. दररोज आईसोबत दहा किलोमीटरचा प्रवास, ना कोणती ट्यूशन ना खासगी मार्गदर्शन.

वेदना, शारिरीक व्याधींसोबत झुंजणाऱ्या अंजलीच्या जिद्दीसमोर परिस्थिती नतमस्तक झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमात ८८ टक्के गुणांसह उत्तीर्ण होतं अंजलीनं परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवले.

म्हणूनच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे आणि सुहासिनीताई कोयटे यांनी गुणवंत अंजलीची राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. भविष्यात अंजलीच्या पाठीशी ‘समता’ ठामपणे उभी असल्याचा विश्वास अंजलीच्या कुटुंबियांना दिला. काकांच्या ‘लढ’ म्हणण्यानं अंजलीला नव बळ मिळालं.

पुणतांबा फाट्याच्या पुढे श्रीरामपूर रोडला चिखले कुटुंबीय राहते. जमीन नाही. मोलमजुरीवर कुटुंबाची गुजराण चालते. आई, वडील, आजी आणि धाकटा भाऊ असं अंजलीचं कुटुंब आहे. जन्मजात गुंतागुतींमुळे अंजलीच्या वाट्याला अपंगत्व आलं आहे. अंजलीच्या यशाला वेदनेची किनार आहे. कुटुंबियांनी उपचारांसाठी शर्थ केली. अपयश वाट्याला आलं. मात्र, अंजलीनं जिद्द आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर शारिरीक वेदना दुय्यम ठरवली.
तुला पुढे काय व्हायचंय?- काका, मला कलेक्टर व्हायचंय.
काकांच्या प्रश्नाला अंजलीनं दिलेल्या उत्तरातून निर्धार झळकत होता. अंजलीला लहानपणापासून अवांतर वाचनाची आवड आहे. तिनं पायाभरणी सुरू केलीयं. कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाची सभासद आहे. समता स्टडी पॉईंटची दिला मदत मिळतेय. आई पुस्तकं घेऊन जाते. अंजली घरी वाचते. तिनं १५० हून अधिक कविता, कथा लेखन केलंय.
खरंतर अंजलीचं यश तिच्यासाठी स्वल्पविराम आहे. जिद्दीनं पावलं टाकल जाईल. तसं यश तिला गवसत जाईल तिला भावी वाटचालीस ओम साई 24 न्यूज परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….
परिस्थितीला झुंजविणारी अंजली प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.



