स्थानिक स्वराज्य निवडणुकांत युवकांना प्राधान्य देत विकासाला गती देण्याचा संकल्प- ज्ञानेश कपिले
स्थानिक स्वराज्य निवडणुकांत युवकांना प्राधान्य देत विकासाला गती देण्याचा संकल्प- ज्ञानेश कपिले
कोपरगांव विजय कापसे दि ७ सप्टेंबर २०२५: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मा.खा. सदाशिवराव लोखंडे व जिल्हाप्रमख नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे युवासेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश कपिले यांनी सांगत बदलत्या सामाजिक, शैक्षणिक व तांत्रिक परिस्थितीत युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याने स्थानिक प्रशासनात त्यांचा सहभाग वाढवत विकासाला गती देण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.जाहिरात
श्री गणेश विसर्जन प्रसंगी उपजिल्हाप्रमुख कपिले पुढे म्हणाले की, “युवक हीच खरी देशाची ताकद आहे. त्यांच्या ऊर्जेतून, नाविन्यपूर्ण विचारांमधून आणि समाजासाठी झटणाऱ्या वृत्तीतून गाव व शहरांच्या विकासाला नवे परिमाण मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात युवकांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली, तर त्याचा थेट फायदा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल.जाहिरात
त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती, डिजिटल सुविधा, पर्यावरण संवर्धन यासारख्या क्षेत्रांत युवकांनी पुढाकार घेतल्यास समाजात सकारात्मक बदल होणार असल्याचेही नमूद केले. नवीन पिढीचा विचार प्रगतशील आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ते पारदर्शक, कार्यक्षम व विकासाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था उभारतील, असा विश्वास कपिले यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीची पहिली पायरी असल्याचे सांगत कपिले म्हणाले की, “गाव व शहरांच्या प्रश्नांवर तत्परतेने उपाययोजना करणे, नागरिकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे, हे युवकांच्या नेतृत्वातून शक्य आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.”जाहिरात
कपिले यांच्या या भूमिकेमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून स्थानिक पातळीवर नव्या नेतृत्वाचा उदय होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.