आत्मा मालिक गुरुकुलच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

आत्मा मालिक गुरुकुलच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला तृतीय क्रमांक; हर्षद कडूस, प्रतीक कुलांगे व आदिती घोरपडे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Kopargaon vijay kapse दि २२ सप्टेंबर २०२६: चंद्रपूर येथे झालेल्या ४५ व्या सब-ज्युनिअर महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघाने दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या संघातील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलच्या हर्षद कडूस, प्रतीक कुलांगे व आदिती घोरपडे या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगड येथे होणार आहे.

महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने चंद्रपूर येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुलात ही स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघात आत्मा मालिक गुरुकुलच्या आयुष कणसे, भावेश सोनवणे, फाईम शेख, प्रतीक कुलांगे, हर्षद कडूस, आदिती घोरपडे, तनुष्का कोरडे व सायली वाघचौरे या खेळाडूंची निवड झाली होती. त्यापैकी हर्षद कडूस, प्रतीक कुलांगे व आदिती घोरपडे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळविले.

या खेळाडूंना संस्थेचे प्राचार्य निरंजनजी डांगे, क्रीडा शिक्षक रविंद्र नेद्रे तसेच प्रशिक्षक अभिषेक कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले, “राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला असून, त्यातील आत्मा मालिक गुरुकुलच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.”




