सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयात भावनिक बुद्धिमत्ता विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयात भावनिक बुद्धिमत्ता विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयात भावनिक बुद्धिमत्ता विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि ५ मार्च २०२६– कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर येथे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर ६ व ७ मार्च रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थी दशेत प्रामुख्याने अध्यापनामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा? आणि विविध विद्याशाखांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध कसा येतो? या महत्त्वपूर्ण पैलूंवर भारतातील विविध राज्यांमधून येणारे तज्ज्ञ अभ्यासक आपले संशोधन लेख सादर करणार आहेत. या विषयातील नामांकित तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून मानवी वर्तणूक आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी भावनिक बुद्धिमत्ता कशी उपयुक्त ठरू शकते यावर सविस्तर चर्चा करणार आहे.

बदलत्या शैक्षणिक प्रवाहात आणि मानवी जीवनात भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात घेऊन या चर्चासत्राचे आयोजन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.

प्रभारी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ व संस्थेचे निरीक्षक नारायण बारे यांनी राज्यासह देशातील संशोधक विद्यार्थी, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक तसेच भावनिक बुद्धिमत्ता या विषयाशी संबंधित सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रा. पांडुरंग मोरे, प्रा. विनोद मैंद, डॉ. संतोष जाधव, प्रा. उमाकांत कदम आणि प्रा. पंकज वाबळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.




