आमदार काळेंचा मास्टर स्ट्रोक; नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कोयटे यांची घोषणा
आमदार काळेंचा मास्टर स्ट्रोक; नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कोयटे यांची घोषणा
काका कोयटे सह दोन दिवसांपूर्वी कोल्हे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेले माजी नगरसेवक कदम यांचा काळे गटात प्रवेश

कोपरगाव विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२५– गेल्या दोन दिवसापूर्वी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे गटाच्या वतीने बहुचर्चित कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांची उमेदवारी जाहीर करत निवडणुकीचे रणशिंग फुंगले असताना ऐनवेळी आमदार आशुतोष काळे यांनी मास्टर स्ट्रोक मारत समता सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश तथा काका कोयटे यांचा काळे गटात थेट प्रवेश करत कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत शहरातील निवडणुकीला एक वेगळाच रंग आणला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तब्बल ९ वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर कोपरगाव चा राजकारणात मातब्बर राजकीय घराणे असलेल्या काळे व कोल्हे गटाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगत असताना आज अखेर दोन्ही प्रमुख गटाचे उमेदवार जाहीर झाले असून प्रमुख लढत कोल्हे गटाचे पराग संधान व काळे गटाचे काका कोठे यांच्यात जरी होणार असली तरी गेल्या अनेक वर्षापासून नगराध्यक्ष पदाची तयारी करत असलेले माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र झावरे, माजी नगरसेविका शिवसेना ठाकरे गटाच्या सपना मोरे, कोल्हे गटाचे नाराज दिपक वाजे तसेच गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काकासाहेब कोयटे यांनी बोलताना सांगितले की, मी गेली ५० वर्षापासून राजकारणात आणि समाजकारणात असल्याने माझे कोपरगाव विषयी तसेच समस्त कोपरगाव वासीयांवर नितांत प्रेम आहे त्यामुळे मी राजकारणातुन बाहेर असलो तरी माझ्या समता परिवाराच्या वतीने तसेच व्यापारी महासंघाच्या वतीने सर्वांना सोबत घेऊन शहरात सामाजिक कार्य करत राहिलो. आज परत आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश करत असून मी नगराध्यक्ष झाल्यानंतर आमदार काळेंच्या सोबत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करत शहर राज्यात १ नंबर वर कसे नेता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत मी एकटा काळे गटाकडून नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून जाणार नाही तर मी माझ्या पक्षाचे सर्वच्या सर्व ३० नगरसेवक घेऊन शहर विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने काम करणार असल्याचे कोयटे यांनी सांगितले.
कोल्हे गटाला खिंडार
विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी कोल्हे गटाकडून प्रभाग ३ मध्ये माजी नगरसेवक जनार्दन कदम यांची उमेदवारी जाहीर झाली होती परंतु आज कदम यांनी काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली थेट आमदार आशुतोष काळे गटात प्रवेश केल्याने कोल्हे गटाला प्रभाग क्रमांक तीन मध्ये नविन उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
लढत होणार तुल्यबळ
कोल्हे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेले पराग संधान व काळे गटाकडून जाहीर झालेले काका कोयटे यांचा संपूर्ण कोपरगाव शहरातील नागरिकांसोबत दांडगा जनसंपर्क आहे. शहरातील प्रत्येकाच्या सुखदुखात हिररीने सहभागी होणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व आहे. दोघे उमेदवार उच्चशिक्षित असून कोपरगाव शहराच्या बाहेर देखील त्यांचा दांडगा संपर्क आहे. तसेच शहर विकासासाठी एक वेगळेच व्हिजन त्यांचा मनात आहे. ते आर्थिक दृष्ट्या देखील स्वयंपूर्ण असल्याने कोपरगाव शहरातील नगराध्यक्ष पदाची लढत ही नक्कीच तुल्यबळ होणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येणारा काळाच ठरवेल पण यंदाची निवडणूक ही नक्कीच रंगतदार होणार हे यावरून स्पष्ट झाले आहे.




