मेन रोड येथील भैरवनाथ मंदिराच्या कामाला मदत करणार – आमदार सत्यजित तांबे
भैरवनाथ मंदिरात आमदार सत्यजित तांबे व डॉ.मैथिलीताई तांबे यांच्याकडून आरती

संगमनेर विजय कापसे दि १३नोव्हेंबर २०२५ संगमनेर शहराच्या मेन रोड भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व शहरवासी यांचे श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले असून त्यांनी डॉ.मैथिलीताई तांबे यांच्या समवेत भैरवनाथ मंदिरात आरती केली.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर शहरी ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत संपन्न शहर आहे. या शहराला मोठे धार्मिक महत्त्व आहे. सर्वधर्मीय लोक संगमनेर शहरात अत्यंत गुण्यागोविंदाने आणि आनंदाने राहतात. हे आपली वैशिष्ट्य आहे. विकास कामांबरोबर सर्व समाज एक परिवारा प्रमाणे राहत आहे. विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या जात आहे. शैक्षणिक केंद्र मेडिकल हब याचबरोबर भरलेली बाजारपेठ आणि शांतता सुव्यवस्था हे वैशिष्ट्य असणाऱ्या संगमनेरकरांना 24 तास स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत आहे.

वैभवशाली इमारतींसह समृद्ध शहर अशी संगमनेरची ओळख असून या शहरांमध्ये नवनवीन योजना सातत्याने राबवण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत. भैरवनाथ मंदिर हे शहरातील हजारो भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असून सर्व नागरिकांनी या कामात मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शहरातील व मेन रोड परिसरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




