कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि २९ नोव्हेंबर २०२५: बुधवार दि २६ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव येथे भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले व संविधान प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे होते. त्यांनी आपल्या भाषणात संविधानाचे ऐतिहासिक महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर कशी आहे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. “संविधान हे केवळ पुस्तक नसून ते आपल्या देशाच्या एकतेचे व प्रगतीचे मार्गदर्शक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

संविधान दिनानिमित्त शाळेत आठवडाभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धांचा समावेश होता. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून विद्यार्थिनींनी संविधान गीताचे सुमधुर गायन सादर केले. या सादरीकरणामुळे देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी तहसीलदार साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रहिवासी, उत्पन्न व जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शासकीय सेवांचा थेट लाभ मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

दुपारी शाळेच्या परिसरात मानवी साखळी उपक्रम राबविण्यात आला. यामधून “संविधानाचे जतन करूया” व “लोकशाही बळकट करूया” असे सामाजिक ऐक्याचे संदेश देण्यात आले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक दाणे आर. व्ही., सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण एस. एस., गुरुकुल प्रमुख गवळी एस. ए., तसेच चावरे आर. डी., पानगे एम. सी., सुवर्णकार बी. डी., हाळे वाय. बी, शिंदे एस. एस. यांच्यासह सर्व शिक्षक बंधू–भगिनी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.




