नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी तरुणाई एकवटली; ९ ऑगस्ट क्रांतीदिनी रास्ता रोको आंदोलन

नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी तरुणाई एकवटली; ९ ऑगस्ट क्रांतीदिनी रास्ता रोको आंदोलन
नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी तरुणाई एकवटली; ९ ऑगस्ट क्रांतीदिनी रास्ता रोको आंदोलन

Sangmner vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६: नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, जुन्नर व खेड परिसरातील नागरिक आणि तरुण मोठ्या प्रमाणावर एकत्र आले आहेत. या मागणीसाठी रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता क्रांती दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्ग संघर्ष समितीने दिली आहे.

या आंदोलनासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तालुक्यांतील तरुणांनी जनजागृती मोहीम राबविली असून सोशल मीडियासह गावोगावी बैठका घेऊन नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संघर्ष समितीच्या माहितीनुसार, सन 2000 पासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, महारेल व रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. 2019 मध्ये या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांना सुमारे 600 कोटी रुपयांची भरपाईही देण्यात आली. मात्र त्यानंतर मार्गात बदल झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
संघर्ष समितीचे म्हणणे आहे की, सध्या प्रस्तावित नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर–पुणे मार्गामुळे मूळ सरळ रेल्वे मार्गाचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरळ मार्गाची मागणी अधिक तीव्र करण्यात आली असून विविध लोकप्रतिनिधींच्या बैठका घेऊन आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे.

या आंदोलनाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, निलेश लंके, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, तसेच आमदार शरद सोनवणे, बाबाजी काळे, विलास लांडे, महेश लांडगे, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे.
संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसा टोलनाका येथे आंदोलन होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्ग संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


