संजीवनी सैनिकी स्कूलचा दिल्लीत घुमला डंका; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले अभिनंदन

संजीवनी सैनिकी स्कूलचा दिल्लीत घुमला डंका; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोपरगाव यांनी ब्रास बँड बॉईज गटात देशात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या दैदीप्यमान कामगिरीबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनीही अभिनंदन केले आहे.

७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत देशातील चारही झोनमधील सर्वोत्तम संघ सहभागी झाले होते. अत्यंत अटीतटीच्या आणि उच्च दर्जाच्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, तालबद्ध वादन आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले, ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे विवेकभैय्या कोल्हे यांनी नमूद केले.









