ड्रग्ज प्रकरणातील आरोपी खा. लंकेंचा कार्यकर्ता? ‘त्या’ फोटोंनी वाढल्या चर्चा

ड्रग्ज प्रकरणातील आरोपी खा. लंकेंचा कार्यकर्ता? ‘त्या’ फोटोंनी वाढल्या चर्चा
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी खा. लंकेंचा कार्यकर्ता? ‘त्या’ फोटोंनी वाढल्या चर्चा

अहिल्यानगर प्रतिनिधी दि २५ जानेवारी २०२६–
पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. गेल्याच आठवड्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या श्यामसुंदर विश्वनाथ गुजर या पोलिस कर्मचाऱ्याला अटक झाली. शिरुर येथील गॅरेजचालक असलेल्या शादाब शेख याच्याकडे सापडलेले ड्रग्ज, हे पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे याने दिल्याचे तपासात समोर आले. आता हाच माऊली शिंदे हा खासदार निलेश लंके यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या आहेत.

माजी डाँ. खा. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांवर काही गंभीर आरोप केले. ड्रग्ज प्रकरणातील म्होरक्या श्यामसुंदर गुजर हा काही दिवसांपूर्वी पारनेर पोलिस स्टेशनला कार्यरत होता. तेथे त्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप झाले होते. अवैध व्यावसायिकांशीही त्याचे संबंध होते. त्याच्याविरोधात तक्रारी झाल्याने त्याची बदली थेट नगर एलसीबी शाखेत करण्यात आली. वास्तविक, गंभीर आरोप असलेल्या पोलिस कर्मचारी एलसीबीत कसा घेतला जातो? असा सवाल डाँ. विखे पाटलांनी उपस्थित केला होता. शिवाय त्याला एलसीबीत घेण्यासाठी कुणाची शिफारस होती? हेही पोलिसांनी पत्रकारांना सांगावे, असे आव्हानही विखे पाटलांनी दिले होते.

आता याच ड्रग्ज प्रकरणातील शिरुर पोलिस ठाण्यात दाखल एफआयआर व्हायरल झाली आहे. त्यात पारनेर तालुक्यातील कोहोकडी, हमावाडी येथील माऊली शिंदेचा सहभाग असल्याचं फिर्यादीत दाखल आहे. याच माऊली शिंदेचे खा. निलेश लंके व त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्यासोबतचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. अगदी माऊली शिंदेच्या मुलाच्या वाढदिवसालाही, खा. लंके उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. आरोपी शिंदे यांचे कुटुंब राणी लंके यांच्यासोबतही काही फोटोत दिसत आहे. याच फोटोवरुन आता राजकारण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी सिस्पे- इन्फिनीटीत आपले नाव जाणिवपूर्वक गोवले गेल्याचे लंके यांनी सांगितले होते. शिवाय पारनेरला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही लंकेंचे म्हणणे होते. परंतु आता पुन्हा एकदा थेट मुख्य आरोपीसोबतचे खा. लंके यांचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. माऊली शिंदेचे नाव आरोपपत्रात येऊ नये, म्हणून एक नेता अर्धा तास पोलिस ठाण्यात बसलेला होता, असा आरोपही डाँ. सुजय विखेंनी केला होता. त्यामुळे हा नेता कोण? या चर्चांनाही उधाण आले आहे.
खा. लंके यांचे यापूर्वी अनेकदा कुख्यात आरोपींसोबतचे फोटो व्हायरल झाले आहे. अगदी पुण्यातील डाँन गज्या मारणेचा सत्कारही खा. लंके यांनी स्विकारला होता. सिस्पेचे संचालक हे आपले पाहूणे आहेत, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यानंतर याच पाहुण्यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला होता. आता ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाल्याने, खा. लंके पुन्हा चर्चेत आले आहेत. तो मी नव्हेच ही भूमिका घेणाऱ्या खा. लंके यांनी या फोटोबाबत प्रतिक्रीया द्यावी, अशी मागणी सध्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.




