छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिवजयंती महोत्सव उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिवजयंती महोत्सव उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शिवजयंती महोत्सव उत्साहात

अहिल्यानगर विजय कापसे दि २१ फेब्रुवारी २०२६– हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान योद्धा राजा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र या विषयावरील संगीतमय नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. या नाटिकेतून महाराजांचे शौर्य, स्वराज्य स्थापनेतील पराक्रम, प्रशासन कौशल्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा प्रभावीपणे उलगडण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभिजीत दिवटे (डायरेक्टर मेडिकल, VIMS) तसेच डॉ. रामचंद्र पडळकर (मुख्य प्रशासकीय अधिकारी, VIMS) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक, शिक्षक, कला-साहित्य लेखक व पुरातत्त्व अभ्यासक डॉ. तुषार बाहेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, मूल्ये, नेतृत्वगुण आणि वारसा या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची, स्त्री-सन्मानाची, लोकाभिमुख प्रशासनाची व स्वराज्य संकल्पनेची सखोल मांडणी करत आजच्या तरुण पिढीने त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर व उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. श्री. अमोल टेमकर आणि सहाय्यक प्राध्यापक श्री. स्वप्निल म्हस्के यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी दुमदुमून गेला. राष्ट्रभक्तीच्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




