स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, यश आपोआप मिळेल – नितिनदादा कोल्हे

स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, यश आपोआप मिळेल – नितिनदादा कोल्हे
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन

Kopargaon vijay kapse दि २६ मार्च २०२६– कोणत्याही व्यक्तीच्या यशामध्ये भाषा कधीच अडथळा ठरत नाही, तर स्वतःमधील क्षमता ओळखून योग्य वेळी त्या सिद्ध करण्याची गरज असते. प्रत्येकामध्ये अपार क्षमता दडलेली असते, मात्र ती संधी मिळाल्यावरच प्रकट होते. बदलत्या काळानुसार स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते, कारण गरज भासल्यास योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षकही मिळतात. जीवनात नेमके काय साध्य करायचे आहे आणि कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे, हे स्पष्ट ठरवणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या कामात वेग आणि नियोजन किती आहे, यावरच यशाची खरे मोजमाप ठरते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी केले.

संजीवनी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने इंडियन सोसायटी फॉर एज्युकेशनच्या सहकार्याने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थी उपक्रम परिषदेने आयोजीत केलेल्या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा ‘संजीवनी टेकफेस्ट ’ उद्घाटन प्रसंगी नितिनदादा कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चिफ टेक्निकल ऑफीसर विजय नायडू, डॉ. प्रसाद पटारे, स्पर्धेचे जज रविंद्र जोशी , हेड ऑफ इन्स्टिटयूट सर्विसेस प्रकाश जाधव, स्पर्धेचे समन्वयक डॉ. मकरंद कुलकर्णी, विभाग प्रमुख, डीन्स उपस्थित होते. सर्व प्रथम स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमा पुजनाने व दीप प्रज्वलाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत ७५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांतर्गत सहभाग नोंदवुन नवोन्मेशक कल्पनांचे सादरीकरण केले.

यावेळी समन्वयक डॉ. कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना आपली कल्पना शक्ती आणि प्रतिभा दाखविण्याची संधी निर्माण केली आहे असे सांगीतले. डॉ. पटारे यांनी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रगतीचा आलेख मांडला.

सदर प्रसंगी श्री नायडू म्हणाले की स्पर्धेमध्ये जिंकणे किंवा हरणे यापेक्षा सहभाग घेणे अधिक महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यातूनच व्यक्तिमत्वाचा आणि कौशल्यांचा खरा विकास घडतो. पूर्वी शैक्षणिक क्षेत्रात केवळ टॉपर विद्यार्थ्यांना अधिक महत्त्व दिले जात होते, मात्र आजच्या काळात विविध कौशल्ये (स्किल सेट) असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळत आहेत. स्पर्धा या केवळ निकालासाठी नसून विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी एक प्रभावी माध्यम आहेत, त्यामुळे प्रत्येकाने त्याचा योग्य लाभ घ्यावा.
श्री जोशी म्हणाले की येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून विद्यार्थ्यांनी त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. संजीवनी संस्थेचे माजी विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रात कार्यरत असून, हीच संस्थेच्या गुणवत्तेची खरी पावती आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम शिकवला जातो, त्याचेच हे यशस्वी फलित आहे. तसेच संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे जिथे कुठे असतील, तेथून संजीवनीची ही यशोगाथा अभिमानाने पाहत असतील, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.



