महात्मा गांधी जयंती निमित्त जयहिंदच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी संगमनेर मध्ये विविध कार्यक्रम

महात्मा गांधीजींची वेशभूषा करून १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी; तर दुपारी जवाहरलाल हाजीर हो पुस्तक प्रकाशन सोहळा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देताना संस्थापक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा आणि शांततेचा संदेश देताना सत्य व अहिंसा हे मूलमंत्र दिले आहेत. त्यांच्याच विचारांची जगाला आज गरज असून त्यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त संगमनेर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७.३० वाजता यशोधन कार्यालय येथील मैदानापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेल्या १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी निघणार आहे. यानंतर संगमनेर बस स्थानक येथे सकाळी ८.३० महात्मा गांधीजी यांचे आवडते भजने सादर केली जाणार आहेत. याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भव्य रांगोळीतून प्रतिमा साकारली जाणार आहे. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तर दुपारी ४ वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी.दादा सभागृह येथे पंकज चतुर्वेदी लिखित आणि राहुल कोसंबी अनुवादित जवाहरलाल हाजीर हो या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मा.महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे व वक्ते संजय आवटे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ.राहुल कोसंबी, श्रीमती प्रमिला माया नारायण, गणेश घुले यांच्यासह आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे.

तरी सकाळी होणारी प्रभात फेरी, संगमनेर बस स्थानकावर होणारे गांधी भजने, व के.बी.दादा सभागृहातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी संगमनेर मधील सर्व नागरिक महिला युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.



