संजीवनी युनिव्हर्सिटीत रंगली भव्य ढोल-ताशा वादन स्पर्धा

संजीवनी युनिव्हर्सिटीत रंगली भव्य ढोल-ताशा वादन स्पर्धा
‘लंबोदर’ संघाने पटकावले ३० हजारांचे प्रथम पारितोषिक; ‘ब्रम्हगर्जना’ द्वितीय तर ‘वननाद’ तृतीय

Kopargaon vijay kapse दि २१ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सांगीतिक, सांस्कृतिक व नेतृत्व कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त भव्य ढोल-ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ‘लंबोदर’ संघाने दमदार वादनाचे सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आणि ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘ब्रम्हगर्जना’ संघाने द्वितीय क्रमांकासह १५ हजार रुपयांचे पारितोषिक, तर संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या ‘वननाद’ संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

विजेत्या संघांना संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री. अमित कोल्हे व संजीवनीच्या संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांच्या हस्ते रोख पारितोषिके, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत युवा पिढीमध्ये सांघिक भावना, शिस्त, समन्वय आणि कलाप्रेम वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. संजीवनी वुमन एम्पावरमेंट सेलसह संजीवनी युनिव्हर्सिटी, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, संजीवनी पॉलिटेक्निक, ज्युनिअर कॉलेज आणि संजीवनी फार्मसी कॉलेजमधील एकूण दहा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक संघात ३० विद्यार्थी सहभागी झाले होते.

ढोल, ताशा, झांज, टोल आणि लेझिमच्या दणदणीत गजराने संजीवनीचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण वादनातून आपल्या कलागुणांचे नेत्रदीपक सादरीकरण केले. ढोलांचा घुमणारा निनाद, ताशांचा कडकडाट आणि लेझिमच्या लयबद्ध तालावर थिरकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे वातावरणात गणेशोत्सवाचा भक्तिमय व सांस्कृतिक रंग भरला होता.
प्रत्येक संघाने उत्कृष्ट समन्वय, शिस्त, तालबद्धता आणि ऊर्जा यांचा सुरेख मिलाफ साधत प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धकांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती.
या स्पर्धेदरम्यान युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे, हेड ऑफ इन्स्टिट्यूट सर्व्हिसेस श्री. प्रकाश जाधव, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. विपुल पटेल, प्राचार्य ए. आर. मिरीकर, डॉ. आर. प्रिया, डॉ. माधुरी जावळे, डॉ. सरिता पवार, प्रा. मनोज गायकवाड आदींनी उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढविले.
स्पर्धेचे संयोजक प्रा. चैतन्य काळे व प्रा. के. डी. पटारे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. नाशिक येथील विक्रांत सोनवणे व रोहित दोंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थी विद्या जगताप, श्रेयश कोते व पार्थ जोशी यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाने स्पर्धेला विशेष रंगत आणली.




