एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात

एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात
‘रयत माउली कृतज्ञता दिन’निमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव
Kopargaon vijay kapse दि २९ सप्टेंबर २०२६: रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘रयत माउली कृतज्ञता दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुनीता आत्रे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समाजसेविका संगीता मालकर, किरण डागा, विमल पुंडे, कावेरी राऊत, किरण जपे, नूतन सरोदे, डॉ. सोनल वाबळे आणि डॉ. मंजुषा वाकचौरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजसेविका संगीता मालकर यांनी, “वर्तनातील बदल हा केवळ विचारांतून नव्हे, तर कृतीतून घडतो,” असे प्रतिपादन केले. किरण डागा यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज व्यक्त केली. विमलताई पुंडे यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व विशद केले. डॉ. मंजुषा वाकचौरे यांनी महिलांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगत यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, “कर्तृत्ववान महिला म्हणजे आपली आई आहे. तिचा सन्मान आपण नेहमीच केला पाहिजे.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांना भावनिक संदेश दिला.
यावेळी पर्यवेक्षक माधव रेवगडे यांच्यासह विज्ञान, वाणिज्य व कला विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री शेंडगे यांनी केले, तर आभार विद्या देवकर यांनी मानले.



