राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांची चमक; साई खेतमाळीस, तुषार रणसिंग यांना रौप्यपदक

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांची चमक; साई खेतमाळीस, तुषार रणसिंग यांना रौप्यपदक
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांची चमक; साई खेतमाळीस, तुषार रणसिंग यांना रौप्यपदक
Kopargaon vijay kapse दि १७ ऑक्टोबर २०२६ : पंढरपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या पैलवानांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पैलवान साई खेतमाळीस आणि पैलवान तुषार रणसिंग यांनी आपापल्या वजनगटांत रौप्यपदक पटकावत आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा मल्ल साई खेतमाळीस याने ६० किलो वजनगटात, तर तुषार रणसिंग याने ६५ किलो वजनगटातील ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत रौप्यपदकाची कमाई केली.

सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांच्या छत्रछायेखाली आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील पैलवान सातत्याने विविध कुस्ती स्पर्धांमध्ये यश संपादन करीत आहेत. कुस्ती केंद्रातील मल्लांना वस्ताद भरत नायकल, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक विवेक नायकल, एनआयएस प्रशिक्षक राजू पाटील आणि अक्षय डांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल साई खेतमाळीस आणि तुषार रणसिंग यांचे कुस्तीप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे कुस्ती केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



