डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधीवादी विचारांचा निष्ठावान दीपस्तंभ हरपला – बाळासाहेब थोरात

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधीवादी विचारांचा निष्ठावान दीपस्तंभ हरपला – बाळासाहेब थोरात
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधीवादी विचारांचा निष्ठावान दीपस्तंभ हरपला – बाळासाहेब थोरात
गांधीवादी विचारांचे पाईक हरपले – डॉ. सुधीर तांबे

Sangmner vijay kapse दि १९ जुलै २०२६- ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी तत्त्वांचे अखंड पुरस्कर्ते आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर कार्य करणारे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी शोकसंदेशात म्हटले की, डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधीवादी विचारांचा निष्ठावान दीपस्तंभ हरपला आहे. युवक क्रांती दल (युक्रांद)च्या माध्यमातून त्यांनी असंख्य तरुणांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक भान तसेच अन्याय आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची प्रेरणा जागवली. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीला नवी दिशा मिळाली. त्यांच्या जाण्याने समाजमनाला विचारांची दिशा देणारा संवेदनशील, अभ्यासू आणि निर्भीड आवाज कायमचा हरपला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना तसेच युक्रांद परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, लोकशाही, सामाजिक न्याय आणि जनजागृतीसाठी आयुष्य समर्पित करणारे डॉ. कुमार सप्तर्षी हे अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आणि गांधीवादी विचारांचे खरे पाईक होते. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे.
डॉ. तांबे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समतेच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी डॉ. सप्तर्षी यांनी आयुष्यभर कार्य केले. युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही डॉ. सप्तर्षी यांचे स्थान अत्यंत मोलाचे असून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
अहिल्यानगर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण केली. पुण्यातील गांधी भवनची वास्तू आणि जागा वाचविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते घडवले. समाजातील विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी अखंड संघर्ष केला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वांवर लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आपण कायम पुरोगामी, समतेचा व मानवतेचा विचार जपला. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे मार्गदर्शन आणि विचार आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे राहिले. त्यांनी ज्या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला, तो विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले.




