डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; बाळासाहेब थोरात यांच्यासह संगमनेरातील मान्यवरांकडून श्रद्धांजली

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; बाळासाहेब थोरात यांच्यासह संगमनेरातील मान्यवरांकडून श्रद्धांजली
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; बाळासाहेब थोरात यांच्यासह संगमनेरातील मान्यवरांकडून श्रद्धांजली
Sangmner vijay kapse दि ४ ऑगस्ट २०२६ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल तथा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली करणारे ते दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी होते. ‘डी. वाय. दादा’ या नावाने महाराष्ट्रभर परिचित असलेल्या दादांनी अत्यंत तरुण वयात महाराष्ट्र विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राच्या उभारणीसाठी समर्पित केले.”
पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमधून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून, उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, आधुनिक शिक्षणाचा ध्यास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची बांधिलकी ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती, असेही थोरात यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी माजी मंत्री तथा काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील आणि संपूर्ण पाटील कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, “परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे बळ देवो,” अशी प्रार्थना केली.
दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे तसेच संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि मान्यवरांनीही शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




