Kopargaon vijay kapse दि १० ऑगस्ट २०२६ : ग्रामीण भागातील विद्यार्थी अत्यंत प्रतिभावान असतात. लोकसेवा व राज्यसेवा या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सर्वाधिक कार्यरत असलेले अधिकारी हे मराठी माध्यमातील शाळेतच शिकलेले असतात. बऱ्याचदा प्रशासकीय सेवेत कार्यरत असल्याने दिंडी सोहळ्याचा आनंद घेता येत नाही. इच्छा असूनही पंढरपूरच्या वारीला जाता येत नाही.जाहिरात
मात्र, कामिका एकादशीनिमित्त आयोजित वारी गावातील बालगोपालांच्या दिंडीच्या माध्यमातून मला प्रत्यक्षात पंढरपूरच्या दिंडीचा अनुभव घेता आला. याचे खरोखरच समाधान आहे. वारी गावातील रामेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पटदेखील चांगला आहे. त्यामुळे हीच मुले पुढील काळात वारी गावाचे नाव निश्चितच मोठे करतील, असे गौरवोद्गार कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज यांनी काढले.जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे रयत शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने कामिका एकादशीनिमित्त शनिवारी (दि. 8) भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात दोन्ही विद्यालयातील 430 पेक्षा अधिक विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज बोलत होते.
सालाबादप्रमाणे कामिका एकादशीनिमित्त दोन्ही शाळांतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली होती. यामध्ये विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम महाराज यांची, तर उर्वरित विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेषभूषा परिधान केली होती. त्याचबरोबर लेझीम पथक, भक्तिगीते, जिल्हा परिषदेच्या बालगोपालांनी पालखीमध्ये विविध शैक्षणिक पुस्तके घेऊन दिंडी काढली. चिमुकल्यांच्या तोंडून ‘जय हरी विठ्ठल’, ‘राम कृष्ण हरी’, ‘विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामघोषाने संपूर्ण वारी गावचा परिसर दुमदुमला होता. यातून काही काळ गावामध्ये अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.जाहिरात
त्यानंतर श्री रामेश्वर विद्यालयात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी पांडुरंगाच्या भक्तिगीतांवर नृत्य,फुगडी व पावल्या सादर केले. तद्नंतर ग्रामपंचायत सदस्य राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील व्यासपीठावर नाद संगीत विद्यालयाचे संचालक हभप शंकर महाराज गोंडे यांच्या संकल्पनेतून भक्तिगीतांच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके, सदस्य ॲड. शरद जोशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव टेके, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाशराव गोर्डे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे, श्रीराम चव्हाण, परसराम टेके, मुख्याध्यापक शरीफ शेख, मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, दत्तात्रय गोर्डे, वाहेदखान पठाण, हभप शंकर महाराज गोंडे, हभप बाबासाहेब महाराज शिंदे, हभप अजय महाराज तुपे, हभप शुभम महाराज तुपे, डॉ. हिमांशू त्रिवेदी, वाल्मिक जाधव, प्रदीप खैरनार, योगेश वाळुंज, अमोल वाघ यांच्यासह पालक व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, महिला पालक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी तर प्रवीण आहेर यांनी आभार मानले.