एस.एस.जी.एम. महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी

Kopargaon vijay kapse दि १७ ऑगस्ट २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी औरंगाबाद खंडपीठाचे वकील अॅड. अजित झोडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. अजित झोडगे म्हणाले, “ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे भांडार नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे आणि भविष्य घडविणारे ज्ञानमंदिर आहे. पुस्तक हेच आपले खरे गुरु आहे, असे मानून त्यांच्या सानिध्यात वेळ घालविल्यास आयुष्य सुकर होते.”
अध्यक्षीय मनोगतात डॉ. घनश्याम भगत यांनी सांगितले की, भारतातील ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या प्रगतीमध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हटले जाते. शियाली रामामृत रंगनाथन यांचा जन्म तमिळनाडूतील शियाली येथे झाला. ग्रंथालये अधिकाधिक लोकाभिमुख व्हावीत आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री मांडली. याच आधारावर ग्रंथालयशास्त्राचा पाया रचला गेला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथपाल प्रा. चंद्रशेखर खैरनार यांनी प्रास्ताविकातून ग्रंथालय व वाचनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी अॅड. कुणाल झाल्टे, प्रा. उज्ज्वला भोर, प्रा. संतोष पवार, प्रा. उत्तम गवळी, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, युवराज ससाणे यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्राध्यापक, ग्रंथालय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधव यशवंत यांनी केले, तर आभार प्रा. सुनील काकडे यांनी मानले.






