वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी कठोर पावले उचला आमदार आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी कठोर पावले उचला
आमदार आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना
वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी कठोर पावले उचला
आमदार आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला सूचना

Kopargaon vijay kapse दि १८ ऑगस्ट २०२६ कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलून प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्कतेने काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.

कोपरगाव शहर व ग्रामीण भागात चोरांचा उपद्रव वाढला असून घरफोड्या, चेन स्नॅचिंग, तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषतः विद्युत मोटार व केबल चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे चोरीच्या वाढत्या घटनांवर तातडीने आळा घाला.

चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसर, संवेदनशील ठिकाणे तसेच ग्रामीण भागात नियमित पोलीस गस्त वाढवावी. रात्रीच्या वेळी विशेष गस्त पथके तैनात करून संशयित व्यक्ती व वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवावे. उपलब्ध सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून चोरीच्या घटनांचा तपास जलदगतीने पूर्ण करावा आणि गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.
नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेवून त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलिसांनी काम करावे. कोपरगाव तालुक्यात यापूर्वी काही पोलीस निरीक्षकांनी प्रभावीपणे काम करून गुन्हेगारीवर वचक निर्माण केला होता. त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील प्रभावी उपाययोजना सध्याच्या परिस्थितीत राबवाव्यात. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहे.या बैठकीस कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आणि कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते.



