सण-उत्सवांच्या काळात संगमनेरची व्यवस्था सुरळीत राहणार; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचना
सण-उत्सवांच्या काळात संगमनेरची व्यवस्था सुरळीत राहणार; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचना
संपूर्ण शहराची प्रत्यक्ष पाहणी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश

Sangmner vijay kapse दि. २० ऑगस्ट २०२६ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा सुरळीतपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू करावी, अशी भूमिका नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी घेतली आहे. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या काळात शहरातील बाजारपेठा व प्रमुख भागांमध्ये होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी शहराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून पुढील तीन महिन्यांचा अहवाल तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या काळात शहरातील मुख्य बाजारपेठा, व्यापारी परिसर, प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढते. त्यामुळे स्वच्छता, कचरा संकलन, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, अंधाऱ्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था, वाहतूक आणि पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

यासाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद कार्यक्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करावी. प्रत्येक विभागाच्या कार्यक्षेत्रातील आवश्यक कामे निश्चित करून त्यानुसार जबाबदारी ठरवावी. तसेच सण-उत्सवांच्या काळात उद्भवू शकणाऱ्या अडचणींची आधीच नोंद घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी केल्या.

तसेच या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती संकलित करून त्यानुसार विभागनिहाय कामांचे नियोजन करावे. त्याचबरोबर या सर्व बाबींचा समावेश असलेला सविस्तर अहवाल व कृती आराखडा पुढील सात दिवसांच्या आत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्याकडे सादर करावा, असे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना कळविण्यात आले आहे.
नागरिकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये आणि शहरातील दैनंदिन व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून आवश्यक तयारी करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी व्यक्त केली आहे




