एस.टी. प्रवाशांसाठी अभिनव सॉफ्टवेअर; संजीवनीच्या साईश्रद्धा सालमुठेला युटिलिटी पेटंट
एस.टी. प्रवाशांसाठी अभिनव सॉफ्टवेअर; संजीवनीच्या साईश्रद्धा सालमुठेला युटिलिटी पेटंट
संजीवनीच्या विद्यार्थिनीच्या संशोधनाचा गौरव; डॉ. मनाली कोल्हे यांच्या हस्ते सत्कार
Kopargaon vijay kapse दि २१ ऑगस्ट २०२६ : संजीवनी जुनिअर कॉलेजमधील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी साईश्रद्धा अरविंद सालमुठे हिने प्रतिभा, जिद्द आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) प्रवाशांसाठी बसची वेळ, मार्ग तसेच रिअल-टाईम बस अपडेट्स सहज उपलब्ध करून देणारे अभिनव सॉफ्टवेअर विकसित केले आहे. तिच्या या समाजोपयोगी संशोधनाची दखल घेत भारत सरकारकडून या प्रकल्पाला युटिलिटी पेटंट प्राप्त झाले आहे.

या प्रणालीचा वापर अत्यंत सुलभ असून प्रवाशांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कोणतेही साईन-अप किंवा लॉगिन न करता थेट संकेतस्थळावर जाऊन संबंधित बसची वेळ, मार्ग आणि अन्य आवश्यक माहिती मिळवता येते. सध्या नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात ही प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित असून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजोपयोगी नवकल्पना साकारण्याची क्षमता आहे, हे साईश्रद्धाने आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिला ‘परिवहन दूत’ म्हणून घोषित केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रणाली संपूर्ण राज्यभर राबविण्याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे, समाजहिताच्या उद्देशाने विकसित केलेल्या या प्रकल्पासाठी साईश्रद्धाने कोणतेही मानधन अथवा आर्थिक मोबदला स्वीकारलेला नाही. तिच्या या निस्वार्थी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
साईश्रद्धाच्या उल्लेखनीय संशोधनाचा गौरव करण्यासाठी संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श अमित कोल्हे यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या हस्ते साईश्रद्धाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चांसलर डॉ. अजयकुमार ठाकूर, एच.ए.जी. डॉ. रावसाहेब शेंडगे, प्राचार्या प्रा. रेखा साळुंके, प्रा. मोहन सोनवणे, प्रा. वैशाली क्षीरसागर, प्रा. प्रियांका नरोडे आणि प्रा. निवृत्ती अष्टेकर उपस्थित होते.

डॉ. मनालीताई कोल्हे यांचे गौरवोद्गार
“साईश्रद्धा सालमुठे हिचे यश हे केवळ तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाचे प्रतीक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या अमर्याद क्षमतेचे द्योतक आहे. संजीवनी जुनिअर कॉलेजमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर देत नाही, तर त्यांच्यामध्ये नवोपक्रमशीलता, संशोधन वृत्ती, तंत्रज्ञान कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करतो.
आधुनिक तंत्रज्ञान, प्रकल्पाधारित शिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. साईश्रद्धाने विकसित केलेले समाजोपयोगी सॉफ्टवेअर आणि त्यासाठी मिळविलेले पेटंट हे तिच्या जिद्दीचे, प्रतिभेचे आणि संजीवनीच्या शैक्षणिक संस्कारांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तिच्या या उल्लेखनीय कार्यामुळे संजीवनी परिवाराचा गौरव वाढला असून ती भविष्यातही अशाच नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे समाजासाठी योगदान देईल, असा मला विश्वास आहे.”



