माझा गाव, माझी जबाबदारी’सोबत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनाही बळ

‘माझा गाव, माझी जबाबदारी’सोबत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनाही बळ
उमंग युवा शक्ती प्रतिष्ठानकडून विद्यार्थ्यांना तबला, पेटी व टाळांची भेट; १५०व्या रविवाराच्या स्वच्छता अभियानाची दमदार वाटचाल
Kopargaon vijay kapse दि १९ सप्टेंबर २०२६: गाव स्वच्छ ठेवणे ही केवळ जबाबदारी नसून, गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीदेखील आपलीच सामाजिक बांधिलकी आहे, या भावनेतून कुंभारी येथील उमंग युवा शक्ती प्रतिष्ठानने अनोखा उपक्रम राबविला. प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवर्य तुकारामबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांना तबला, पेटी व टाळ ही वाद्ये शालेय साहित्य म्हणून भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयात उत्साहाचे तसेच भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता संगीत, कला आणि संस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाद्ये उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून, शालेय सांस्कृतिक उपक्रमांना यामुळे निश्चितच चालना मिळणार आहे.

दरम्यान, उमंग युवा शक्ती प्रतिष्ठानच्या ‘माझा गाव, माझी जबाबदारी’ या स्वच्छता अभियानाचा येत्या रविवारी १५० वा रविवार पूर्ण होत आहे. गेल्या अनेक रविवारपासून प्रतिष्ठानचे युवक श्रमदानातून गावातील स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची निगा आणि सामाजिक बांधिलकीचे कार्य सातत्याने करीत आहेत. स्वच्छतेच्या या अभियानासोबतच आता शिक्षण, कला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही प्रतिष्ठानने प्राधान्य दिले आहे.
‘स्वच्छ गावासोबतच सक्षम, सुसंस्कारी आणि गुणवंत पिढी घडविणे हीदेखील आपली जबाबदारी आहे,’ या विचारातून भविष्यातही शिक्षण व सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिवारातील सर्व मित्रांनी एकत्र येत विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती गीते मॅडम तसेच गुणवत्ता विकास प्रमुख श्रीमती रणशूर मॅडम यांच्याकडे वाद्ये सुपूर्त केली. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री. चिंधे सर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे ग्रामस्थ, हितचिंतक नागरिक, माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच पालकांकडून कौतुक होत आहे. स्वच्छतेपासून शिक्षणापर्यंत सामाजिक योगदानाची व्याप्ती वाढविणाऱ्या उमंग युवा शक्ती प्रतिष्ठानच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विद्यालयाच्या विकासासाठीही सातत्यपूर्ण योगदान
उमंग युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने विद्यालयाला अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, नियमित गेस्ट लेक्चर व करिअरविषयक व्याख्यानांसाठी सहकार्य, वॉटर फिल्टर, सोलर सुविधा, बोरवेल प्लांट, कॉम्प्युटर लॅब, सीसीटीव्ही कॅमेरे, व्यायाम साहित्य आदी विविध सुविधा व साहित्य यापूर्वीही उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठानचे हे योगदान उल्लेखनीय ठरत आहे.




