सुधीर डागा यांची महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या अध्यक्षपदी निवड

सुधीर डागा यांची महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या अध्यक्षपदी निवड
सुधीर डागा यांची महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या अध्यक्षपदी निवड
Kopargaon vijay kapse दि ३० सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या अध्यक्षपदी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा बालाजी सुपर मार्केटचे संचालक सुधीर डागा यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी मुंबई येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड जाहीर केली.

सुधीर डागा गेल्या ३५ वर्षांपासून किराणा व्यवसायात कार्यरत असून, बदलत्या काळाची गरज ओळखून पॅकिंग किराणा मालाची संकल्पना कोपरगावात त्यांनी प्रारंभीच्या काळातच सुरू केली. व्यवसायासोबतच व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
ऑनलाइन व्यापारातील वाढती स्पर्धा, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, वजन व किमतीतील तफावत यासह किरकोळ व्यापाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी त्यांनी ‘वन नेशन–वन वेट–वन रेट’ ही संकल्पना शासन दरबारी मांडली आहे.

डागा म्हणाले, “माझी दोन्ही मुले आता व्यवसायाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे व्यापाऱ्यांची एकजूट मजबूत करणे, त्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे आणि बदलत्या काळानुसार व्यापार क्षेत्रात आवश्यक बदलांबाबत प्रबोधन करण्यासाठी अधिक वेळ देता येणार आहे.”
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर व पदाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव येथे भेट देऊन व्यापारी महासंघाच्या कामाचे कौतुक केले होते. तसेच ‘गाव तेथे उद्योजक’ या संकल्पनेअंतर्गत जानेवारीत शिर्डी येथे राज्यव्यापी अधिवेशन व उद्योगपतींच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून, त्याच्या तयारीसाठी डागा सहकाऱ्यांसह महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत.


या निवडीबद्दल कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, व्यापारी महासंघाचे खजिनदार तुलसीदास खुबानी, अजित लोहाडे, महासचिव प्रदीप साखरे आदींनी अभिनंदन केले.
कोपरगावला राज्यातील किरकोळ व्यापाऱ्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने स्थापन केलेल्या महाराष्ट्र रिटेलर्स फोरमच्या माध्यमातून डागा व्यापाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केला.



