संजीवनी युनिव्हर्सिटीच्या दोन टीमचा राष्ट्रीय हॅकाथॉनमध्ये टॉप टेनमध्ये डंका

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या दोन टीमचा राष्ट्रीय हॅकाथॉनमध्ये टॉप टेनमध्ये डंका
आयबीएम नॅशनल हॅकाथॉनमध्ये ४०० संघांमधून अव्वल दहा; दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य
Kopargaon vijay kapse दि २० सप्टेंबर २०२६ : संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AIML) विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोयंबतूर (तमिळनाडू) येथे नुकत्याच झालेल्या आयबीएम नॅशनल हॅकाथॉन २०२६ स्पर्धेत देशभरातील सुमारे ४०० संघांमधून संजीवनी युनिव्हर्सिटीच्या दोन संघांनी अव्वल दहा संघांमध्ये स्थान मिळविले.

ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या संजीवनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञानाधारित सामाजिक समस्यांवरील उपाययोजनांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी सादर केलेल्या प्रकल्पांवर पुढील संशोधनासाठी आयबीएमकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आयबीएम नॅशनल हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष आव्हानांवर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाधारित उपाय शोधण्याची संधी दिली जाते. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विविध वास्तविक समस्या विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येतात. त्यावर विद्यार्थी कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि टीमवर्कच्या माध्यमातून उपाययोजना विकसित करून परीक्षकांसमोर सादर करतात.
या स्पर्धेत नेहा संजय चव्हाण, पायल सतीश गायकवाड, ओंकार दत्तात्रय वाकचौरे आणि अपर्णा प्रकाश मतसागर यांच्या संघाने ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर प्रकल्प सादर केला. तर दिगंबर अर्जुन महाजन, रोहित संदीप तुपे, अजित देविदास नवले आणि आदित्य संतोष गांगुर्डे यांच्या संघाने ‘रोड सेफ्टी इन इंडिया’ या विषयावर नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला.

परीक्षकांनी नावीन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक गुणवत्ता, समस्या सोडविण्याची क्षमता, व्यावहारिक उपयोगिता आणि सादरीकरण कौशल्य या विविध निकषांवर मूल्यांकन केले. या मूल्यांकनात संजीवनीच्या दोन्ही संघांची देशातील पहिल्या दहा संघांमध्ये निवड झाली. विद्यार्थ्यांना प्रा. सौहरद्या गायेन आणि प्रा. शिवानी पामु यांनी मार्गदर्शन केले.
‘ग्रामीण ते ग्लोबल’ वाटचालीला बळ
“संजीवनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयबीएम नॅशनल हॅकाथॉनसारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत देशातील अव्वल दहा संघांमध्ये स्थान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कल्पकता आणि स्पर्धात्मक क्षमता सिद्ध केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि सामाजिक समस्यांवरील तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांच्या माध्यमातून त्यांनी नवोन्मेशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. हे यश संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि संशोधन संस्कृतीची राष्ट्रीय पातळीवरील पोचपावती आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक संधी उपलब्ध करून देत ‘रूरल टू ग्लोबल’ हे स्वप्न साकार करण्यासाठी संजीवनीची वाटचाल सुरू आहे.” अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी
संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर प्रेसिडेंट अमित कोल्हे यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, डीन डॉ. कविथा राणी, विभागप्रमुख डॉ. देवयानी जाधव, प्रा. सौहरद्या गायेन आणि प्रा. शिवानी पामु उपस्थित होते.
संजीवनीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय भरारी
४०० संघांमधून अव्वल १० मध्ये स्थान मिळवत संजीवनी युनिव्हर्सिटीच्या दोन संघांनी राष्ट्रीय स्तरावर आपली तांत्रिक गुणवत्ता सिद्ध केली. ‘सायबर सिक्युरिटी’ आणि ‘रोड सेफ्टी इन इंडिया’ या दोन महत्त्वपूर्ण विषयांवरील प्रकल्पांना पुढील संशोधनासाठी आयबीएमकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याने संजीवनीच्या ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचालीला नवे बळ मिळाले आहे.



