भारनियमन आणि पाणीटंचाईच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपाययोजना कराव्यात: ना. राधाकृष्ण विखे पाटील

भारनियमन आणि पाणीटंचाईच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपाययोजना कराव्यात: ना. राधाकृष्ण विखे पाटील
जनता दरबाराच्या माध्यमातून जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Loni vijay kapse दि २१ सप्टेंबर २०२६-“टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन महसूल, महावितरण आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. ग्रामीण भागातील भारनियमन कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पंचायत समितीच्या माध्यमातून टँकरचे सुयोग्य नियोजन करून पाणीपुरवठा करण्याबाबतही चोख व्यवस्था करावी,” अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी लोणी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या प्रश्नांची निवेदने स्वीकारली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन प्राप्त झालेल्या नागरिकांच्या सर्व निवेदनांवर लवकरात लवकर कार्यवाही करून, त्यांना त्याबाबतचे स्पष्टीकरण कळवावे, असे निर्देश दिले. या बैठकीस सर्व विभागांचे आधिकारी उपस्थित होते.

जनता दरबारामध्ये प्रामुख्याने भारनियमनाच्या मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री विखे पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात अतिशय जागरूकतेने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बहुतेक ठिकाणी रोहित्रांचे प्रश्न निर्माण झाल्याने भारनियमनाचे प्रमाण वाढले आहे. अनेक गावांमध्ये कृषी आणि गावठाण फिडर एकत्रित झाल्यामुळेसुद्धा भारनियमनाचे संकट वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याकडील जबाबदारी असलेल्या गावांचा प्रत्यक्ष सर्व्हे करून सविस्तर अहवाल सादर करावा. दिनांक २४ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीची स्वतंत्र बैठक घेऊन पुन्हा त्याबाबतचा सविस्तर आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यामध्येही काही तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. याबाबत मागील बैठकांमध्ये टँकरच्या नियोजनाबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. गावनिहाय त्याचे काटेकोर वेळापत्रक तयार करावे आणि मागणीप्रमाणे टँकर कसे उपलब्ध करून देता येतील, याचे काम अतिशय संवेदनशीलतेने सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी करावे. प्रामुख्याने संगमनेर तालुक्यात टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, त्या बाबतीतही योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. ज्या भागांमध्ये आवर्तनाचा कालावधी संपला असेल, तिथे कालव्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या उपलब्ध निधीतून रस्त्यांची कामे दर्जेदार कशी होतील याची दक्षता घ्यावी; या योजनेचा स्वतंत्र आढावा घेणार असल्याचेही मंत्री विखे पाटील म्हणाले. प्रत्येक तालुक्यात जाऊन टंचाई परिस्थितीचा आढावा आपण स्वतः घेणार असून, टंचाईच्या संदर्भातील गावनिहाय भेटींचा प्राथमिक अहवाल अधिकाऱ्यांनी तयार ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.




