आपला जिल्हा

न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

Kopargaon vijay kapse दि २४ सप्टेंबर २०२६: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी विविध उपक्रमांनी व प्रेरणादायी वातावरणात जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे होत्या. प्रमुख उपस्थितांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य तथा एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप गोरखनाथ वर्पे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेश विठ्ठलराव बोळीज तसेच प्रमुख वक्ते प्रा. संभाजीराव दरोडे उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण, गरीब, शेतकरी, शेतमजूर तसेच वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या विचारातून त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनविले.

जाहिरात

कर्मवीरांचा जीवनसंघर्ष आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ : ॲड. संदीप वर्पे
ॲड. संदीप वर्पे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्यामागील सामाजिक जाणिवेवर प्रकाश टाकला. कर्मवीरांचे जीवन केवळ शिक्षणसंस्था उभारण्यापुरते मर्यादित नव्हते, तर अन्याय, विषमता, अस्पृश्यता आणि जातिभेदाविरुद्धची सामाजिक लढाई होती, असे त्यांनी सांगितले.
शिक्षणापासून वंचित समाजघटकांतील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी कर्मवीरांनी आयुष्यभर संघर्ष केला. सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी वसतिगृहे उभारून त्यांनी सामाजिक समतेचा प्रत्यक्ष प्रयोग केला.
‘जात-पात, धर्म-पंथ यांच्या भिंती शिक्षणाच्या माध्यमातून दूर करून माणसाला माणूस म्हणून घडविणे, हीच कर्मवीरांना खरी आदरांजली आहे,’ असे प्रतिपादन ॲड. वर्पे यांनी केले.

जाहिरात

कर्मवीरांचे त्यागी जीवन शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आदर्श : सुरेश बोळीज
सुरेश विठ्ठलराव बोळीज यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्याग, समर्पण, कष्ट आणि स्वावलंबनाच्या विचारांचा विशेष उल्लेख केला. आर्थिक परिस्थितीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी कर्मवीरांनी ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.
‘कर्मवीरांनी स्वतः कष्ट केले, विद्यार्थ्यांना कष्टाची शिकवण दिली आणि शिक्षणातून स्वाभिमान निर्माण केला. त्यांचे समर्पण आजच्या प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्याने आत्मसात करण्याची गरज आहे,’ असे बोळीज यांनी नमूद केले.

जाहिरात

संघर्षातून सामाजिक परिवर्तनाची गाथा : प्रा. संभाजीराव दरोडे
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संभाजीराव दरोडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी पट उपस्थितांसमोर उलगडला. ग्रामीण भागातील दारिद्र्य, अज्ञान आणि शिक्षणाचा अभाव यांची जाणीव कर्मवीरांच्या मनावर खोलवर झाली. त्यातूनच त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतला. १९१९ मध्ये काले येथे रयत शिक्षण संस्थेच्या कार्याची सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितले.
कर्मवीरांनी केवळ शाळा सुरू केल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, समता, बंधुता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचे कार्य केले. ‘कर्मवीरांच्या कार्याचा खरा अर्थ त्यांच्या संस्थांची संख्या मोजण्यात नसून, त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून किती जीवनांना दिशा दिली यामध्ये आहे,’ असे प्रा. दरोडे यांनी सांगितले.

जाहिरात

कर्मवीरांच्या विचारांचा वारसा पुढे न्या : रेणुका कोल्हे
अध्यक्षीय मनोगतात सौ. रेणुकाताई कोल्हे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली.
कर्मवीरांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार न करता वंचित आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. माणसामाणसातील भेद दूर करून समतेवर आधारित समाज निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते, असे त्यांनी सांगितले.
‘कर्मवीरांनी लावलेला शिक्षणाचा वटवृक्ष आज विशाल झाला आहे. या वटवृक्षाच्या सावलीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने कर्मवीरांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे,’ असे आवाहन सौ. रेणुकाताई कोल्हे यांनी केले.
आजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता श्रमाची प्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी, माणुसकी, समता आणि स्वावलंबन यांचे संस्कार द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत, शाळेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी आनंदा निवृत्ती खेडकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), सुभाष यादव गुरुजी, डॉ. साहेबराव पानगे, बाळासाहेब निकोले, चंद्रकांत शिवरकर, कुशाराम सुराळकर, संतोष सुराळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगावचे सभापती साहेबराव रोहोम, बापूसाहेब सुराळकर, नंदिनीताई सुराळकर, मंदाकिनी आहेर, डॉ. सुयोग भंडारी, किरण दिलीपराव गायकवाड, अतुल सुराळकर, चेतन कोकाटे, सुभाष दादा गायकवाड, केंद्रप्रमुख आशिष पारडे, जि.प. प्राथमिक शाळा येसगावच्या मुख्याध्यापिका कदम मॅडम, पत्रकार लक्ष्मणराव वावरे, दीपक गायकवाड, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन कदम, ह.भ.प. सागर महाराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ ठाकरे यांनी करून दिला. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीसोबतच रयत शिक्षण संस्थेच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन उपशिक्षक रामदास गायकवाड यांनी केले, तर पर्यवेक्षिका जयश्री आंबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्याग, समर्पण, स्वावलंबन, सामाजिक समता आणि जातिभेद निर्मूलनाच्या विचारांचा नव्या पिढीपर्यंत जागर करणारा हा जयंती सोहळा ठरला. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या कर्मवीरांच्या विचारांचा जागर करत कार्यक्रमाची सांगता झाली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे