शिर्डीत ९ ऑक्टोबरला भव्य ‘आनंद नोकरी मेळावा-२०२६’

शिर्डीत ९ ऑक्टोबरला भव्य ‘आनंद नोकरी मेळावा-२०२६’
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुढाकारातून सुमारे ५ हजार युवकांना रोजगाराची संधी; ७८ हून अधिक कंपन्यांचा सहभाग
Shirdi vijay kapse दि २५ सप्टेंबर २०२६ : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या पुढाकारातून शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आत्मा मालिक संकुल, कोकमठाण येथे भव्य ‘आनंद नोकरी मेळावा-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या मेळाव्यात सुमारे ५ हजार युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच ऑफर लेटर देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती खासदार वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ शेतीच्या दृष्टीने सधन मानला जात असला, तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक सक्षम युवकांना रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागते. या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी पुणे येथील युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची मदत घेण्यात येत असून, जवळपास ७८ हून अधिक नामांकित कंपन्या आपल्या एचआर टीमसह मेळाव्यात सहभागी होणार आहेत. अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिर्डी परिसरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ऑटोमोबाईल, आयटी, बँकिंग, फायनान्स, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक्स, रिटेल, सेल्स अँड मार्केटिंग, बीपीओ/आयटीईएस, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी आदी विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी मेळाव्यात उपलब्ध असतील. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, सन फार्मास्युटिकल्स, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो आणि मारुती सुझुकी यांसारख्या नामांकित कंपन्यांशी संबंधित रोजगाराच्या संधींचा समावेश राहणार आहे. यासोबतच स्थानिक व प्रादेशिक पातळीवरील एमएसएमई, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल अॅन्सिलरी, सर्व्हिस सेक्टर आणि इतर कंपन्यांचाही सहभाग राहणार आहे.
या मेळाव्यात पाचवी उत्तीर्ण उमेदवारांपासून उच्च पदवीधरांपर्यंत सर्वांना सहभागी होता येणार आहे. अनुभवी उमेदवारांसाठीही त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे, मेळाव्यात नोकरीची निवड न झालेल्या उमेदवारांना ‘जॉब कार्ड’ देण्यात येणार आहे. हे कार्ड सहा महिन्यांसाठी वैध राहणार असून, या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या योग्य रोजगाराच्या संधींसाठी उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना संबंधित कंपन्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महिलांसाठी गृहउद्योग प्रशिक्षण
नोकरीच्या संधींसोबतच महिलांसाठी गृहउद्योग व स्वयंरोजगार प्रशिक्षणाची नोंदणीही करण्यात येणार आहे. स्वतःचा गृहउद्योग किंवा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना आवश्यक कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
युवा हबचे दीपक पवार (Founder Director & CEO) आणि किरण रहाणे (Director) यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, शिवसेना नेते राजेंद्र झावरे, युवानेते मुकुंद शिनगर, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख ज्ञानेश कपिले यांच्यासह सचिन मलिक, रिंकेश जाधव, ओंकार गोंदकर, ज्ञानेश्वर सानप आदी पदाधिकारी तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी मुकुंद शिनगर यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले. तसेच जास्तीत जास्त युवकांनी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारे नोकरीसाठी अधिकृत नोंदणी करून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.



