आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ कार्यशाळा

आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ कार्यशाळा
शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करणार – शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड

Kopargaon vijay kapse दि २८ सप्टेंबर २०२६ : शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागाच्या विविध योजना कार्यरत असून, विविध शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना, यू-डायस, सरल पोर्टल तसेच विविध समित्यांचे कामकाज हे विषय महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेस शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी संजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, अभयकुमार वाव्हळ, धुमाळ, विस्तार अधिकारी सुरेश ढवळे तसेच राहाता, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर व अकोले तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या हस्ते झाले. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सूत्रसंचालन करून मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी संजय सरोदे आणि विस्तार अधिकारी सुरेश ढवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘कुशल प्रशासक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेस उपस्थितांसाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली.



