एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर सप्ताह उत्साहात वक्तृत्व, काव्यवाचन व प्रश्नमंजुषा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर सप्ताह उत्साहात
वक्तृत्व, काव्यवाचन व प्रश्नमंजुषा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर सप्ताह उत्साहात
वक्तृत्व, काव्यवाचन व प्रश्नमंजुषा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Kopargaon vijay kapse दि २८ सप्टेंबर २०२६ : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त आयोजित कर्मवीर सप्ताहाच्या अनुषंगाने एस.एस.जी.एम. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व, काव्यवाचन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख उपस्थित होते. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले.

या तिन्ही स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व लक्षणीय प्रतिसाद मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत कु. स्नेहल माने, काव्यवाचन स्पर्धेत कु. विद्या लांडगे, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत चि. चैतन्य थोरात व कु. ऋतुजा धाकतोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावीपणे विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली. काव्यवाचनातून विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्यिक व कलात्मक गुणांचे दर्शन घडविले. तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामान्यज्ञानासह बौद्धिक क्षमतेचे प्रभावी प्रदर्शन केले.

स्पर्धांचे परीक्षक म्हणून सविता चव्हाण, ज्योती लामखडे, अरुणा चिंधे, विद्या देवकर, राजेंद्र काळे व भरत पवार यांनी काम पाहिले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य रविंद्र हिंगे, कला विभागप्रमुख कलावती देशमुख व विज्ञान विभागप्रमुख अण्णासाहेब गोराणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. सुनिता अत्रे यांनी केले. आभार प्रदर्शन ज्योती लामखडे यांनी केले, तर सूत्रसंचालन जयश्री शेंडगे यांनी केले.



