कोपरगाव नगरपरिषदेत नगरसेविकेच्या पतीने घेतली बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, सभापती पद रद्द करण्याची मागणी
कोपरगाव नगरपरिषदेत नगरसेविकेच्या पतीने घेतली बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, सभापती पद रद्द करण्याची मागणी
कोपरगाव नगरपरिषदेत नगरसेविकेच्या पतीने घेतली बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, सभापती पद रद्द करण्याची मागणी
Kopargaon vijay kapse दि २२ ऑक्टोबर २०२६ :- कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या शिक्षण समितीच्या सभापती संजना उर्फ दिपाली संजय उदावंत यांचे पती संजय उदावंत यांनी त्यांच्या पत्नीच्या सभापती पदाचा अनधिकृतपणे गैरवापर करून स्वत: सभापती असल्याच्या अविर्भावात चक्क सभापतीच्या खुर्चीवर बसून कोपरगांव नगरपरिषद वाचनालय येथे शिक्षण समितीची बैठक घेतल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात निवेदन देवून संजना उर्फ दिपाली संजय उदावंत यांचे सभापतीपद रद्द करण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेसने असे म्हटले आहे की, नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायदेशीर चौकटीत कार्यरत असलेली लोकशाही संस्था आहे. नगरपरिषदेतील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपापल्या पदाच्या अधिकार मर्यादित राहून कामकाज करणे अपेक्षित आहे. सभापतींच्या पदाशी संबंधित अधिकारांचा वापर हा नियमानुसार अधिकृत व्यक्तीकडूनच होणे आवश्यक आहे. मात्र कोपरगाव नगरपरीषदेच्या शिक्षण विभागाच्या सभापतींचे पती हे स्वतः सदर पदावर नसतांना देखील त्यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून शुक्रवार (दि.१६) रोजी कोपरगाव नगरपरिषद वाचनालय येथे शिक्षण समितीची बैठक घेतली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. तसेच सभेच्या विषय नोंदणी रजिस्टरवर सभापती संजना उर्फ दिपाली संजय उदावंत यांच्या नावाने करण्यात आलेली सही देखील डुप्लिकेट केलेली आहे. हे अत्यंत चुकीचे असून कायदेशीर व प्रशासकीय दृष्टीने या अनधिकृत बैठकीची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

नगरसेविका संजना उर्फ दिपाली संजय उदावंत यांच्या पतीच्या अनाधिकृत बैठकीचे प्रकारण दिसते तेवढे सोपे नसून त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या कामकाजातील शिस्त, पारदर्शकता आणि पदाधिकाऱ्यांच्या अधिकारमर्यादांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, नगरपरिषदेच्या अधिकृत कामकाजात बाह्यस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप कोणत्या अधिकाराखाली करण्यात आला, बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आणि त्या बैठकीतील निर्णयांची वैधता काय आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल न घेतल्यास कोपरगाव नगरपरिषदेच्या कामकाजात अनधिकृत हस्तक्षेपाला एकप्रकारे प्रोत्साहन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नगरसेविका सौ.संजना उर्फ दिपाली संजय उदावंत यांचे सभापतीपद रद्द करणेबाबत गंभीरपणे विचार करावा असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेल्या पत्रात शेवटी म्हटले असून निवेदनासोबत त्या अनाधिकृत बैठकीचे फोटो व शुक्रवार (दि.१६) रोजी झालेल्या त्या शिक्षण समितीच्या अनाधिकृत सभेच्या विषय नोंदणी रजिस्टरमधील नोंद झालेल्या सभेच्या इतिवृत्ताची झेरॉक्स प्रत,ज्यामध्ये सभापती संजना उर्फ दिपाली संजय उदावंत यांच्या नावाने करण्यात आलेली डुप्लिकेट सही जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीसाठी सोबत जोडण्यात आलेली आहे.




