आपला जिल्हा

एसएमबीटी हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; दोन वर्षात २४ डोहाळे जेवण

एसएमबीटी हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम; दोन वर्षात २४ डोहाळे जेवण

दोन वर्षांत २४ डोहाळे जेवण; १८ हजारांहून अधिक सोनोग्राफी व दोन हजारांपेक्षा अधिक प्रसूती मोफत

Nashik vijay kapse दि २४ ऑक्टोबर २०२६ : ग्रामीण भागातील गरजू महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात येत असलेला मोफत आरोग्यसेवेचा उपक्रम अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. गर्भवती महिलांसाठी नॉर्मल (प्राकृतिक) प्रसूती असो अथवा सिझेरियन प्रसूती, दोन्ही प्रकारच्या प्रसूती पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत. तसेच गर्भधारणेच्या नऊ महिन्यांच्या काळात गर्भाची योग्य वाढ व प्रकृतीची तपासणी होण्यासाठी आवश्यक असलेल्या चारही सोनोग्राफी तपासण्याही मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

जाहिरात

हॉस्पिटलच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५ हजारांहून अधिक एएनसी (ANC) रुग्ण महिलांनी प्रसूतीपूर्व सेवांचा लाभ घेतला असून, १८ हजारांहून अधिक सोनोग्राफी तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत. या मोफत आरोग्यसेवांच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक लाभार्थ्यांना प्रसूतीचा थेट लाभ मिळाला आहे.

डोहाळे जेवणातून मातांना मानसिक आधार

गर्भवती महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच त्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून अनोख्या पद्धतीने २४ डोहाळे जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांत महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. गर्भावस्थेतील विविध टप्प्यांमध्ये कोणती काळजी घ्यावी, आहार कसा असावा आणि प्रसूतीपूर्व तयारी कशी करावी, याबाबत तज्ज्ञांकडून माहिती दिली जाते.

जाहिरात

केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित न राहता गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. गर्भधारणा राहिल्यापासून बाळाच्या जन्मापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांना मार्गदर्शन केले जाते.

यामध्ये गर्भसंस्काराचे महत्त्व, बाळाचा बौद्धिक व मानसिक विकास, गरोदरपणात घ्यावयाची काळजी, नियमित व्यायाम, आहारविषयक समुपदेशन, उच्च जोखमीची गर्भधारणा, अकाली जन्मलेले बाळ, एनआयसीयू सुविधा, बालशस्त्रक्रिया, लसीकरण तसेच रक्ताल्पता (ॲनिमिया) टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सकस आहाराबाबत सविस्तर माहिती दिली जाते.

बारीक-सारीक बाबींवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष लक्ष दिले जात असल्याने गर्भवती महिलांमध्ये सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

जाहिरात

आरोग्यमित्रांची महत्त्वपूर्ण भूमिका

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना हातभार लावत एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध नवोपक्रम राबविण्यात येत आहेत. या लोककल्याणकारी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या आरोग्यमित्रांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

ग्रामीण भागातील गरजू महिलांचा शोध घेणे, त्यांना वेळेवर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आणणे तसेच प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हे काम आरोग्यमित्र निष्ठेने करत आहेत. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे जिल्ह्यातील शेकडो महिलांना मोफत आरोग्य सुविधांचा थेट लाभ मिळत आहे.

या उपक्रमामुळे सामान्य कुटुंबांवर उपचारासाठी येणारा हजारो रुपयांचा आर्थिक भार आणि कर्जाचा बोजा टाळण्यास मदत होत असून, अनेक कुटुंबांचे सुरक्षित आणि आनंदी बाळंतपणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे.

नवजात बालकांपासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलांवरही मोफत उपचार

मातांच्या मोफत प्रसूतीसोबतच जन्माला येणाऱ्या नवजात अर्भकापासून ते १६ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जात आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये शून्य ते १६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी आवश्यक असलेले विविध वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली विविध आजारांवर उपचार, मोफत औषधोपचार आणि आवश्यक आरोग्य तपासण्या केल्या जातात. संसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच कुपोषणमुक्तीसाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत.

आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आणि तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बालकांना उपचार उपलब्ध करून देत त्यांचे आरोग्य निरोगी व सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे.

 डोहाळे जेवणातून अनेक हेतू साध्य

गरोदरपणात महिलांच्या आरोग्याची काळजी अत्यंत महत्त्वाची असते. अनेक गर्भवती महिलांना गर्भधारणेचा काळ कसा घालवावा आणि कोणती काळजी घ्यावी, याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. महिलांना साध्या-सोप्या भाषेत आवश्यक त्या बारीक-सारीक गोष्टी समजावून सांगण्यासाठी डोहाळे जेवण हा चांगला पर्याय ठरतो. एकीकडे महिलांचे डोहाळे पुरविले जातात, तर दुसरीकडे सर्वाधिक काळजी घेण्याच्या काळात त्यांना आवश्यक आरोग्यविषयक माहिती दिली जाते. यासोबतच स्त्रीरोग विभागातील विद्यार्थ्यांना आपण कुठे काम करतो, कुणासाठी काम करतो, भविष्यात डॉक्टर झाल्यानंतर रुग्णांप्रती माणुसकी, करुणा आणि सहानुभूती कशी असावी, याचा धडा देण्यातही आम्हाला यश येत आहे.

– डॉ. किरण राजोळे, स्त्रीरोगतज्ज्ञ व विभागप्रमुख, एसएमबीटी हॉस्पिटल

 शून्य ते १६ वर्षांच्या बालकांवर मोफत उपचार

मातांच्या मोफत प्रसूतीसोबतच त्यांच्या बालकांच्या आरोग्यालाही आम्ही तितकेच प्राधान्य दिले आहे. जन्मापासून ते सोळा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींवर होणारे विविध प्रकारचे उपचार, संसर्गजन्य आजारांवरील औषधोपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा एसएमबीटीमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. कुपोषणमुक्तीपासून लहान मुलांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने आणि तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञांमार्फत उपचार केले जातात. बालकांचे आरोग्य निरोगी आणि सुरक्षित ठेवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.

– सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा, एसएमबीटी हॉस्पिटल

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे