आपला जिल्हा

अमृतवाहिनी विद्यापीठाची भविष्यवेधी शैक्षणिक वाटचाल; बी.टेक. व एम.टेक. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या दोन नवीन अभ्यासक्रमांचा उत्साहात शुभारंभ

अमृतवाहिनी विद्यापीठाची भविष्यवेधी शैक्षणिक वाटचाल; बी.टेक. व एम.टेक. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या दोन नवीन अभ्यासक्रमांचा उत्साहात शुभारंभ

पुढील वर्षी बायोइंजिनिअरिंग, एआय, सायबर सिक्युरिटी व रोबोटिक्सचे अभ्यासक्रम सुरू होणार

Sangmner vijay kapse दि ६ नोव्हेंबर २०२६– शिक्षण, संशोधन, नवतंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम बनविण्याच्या उद्देशाने लोकनेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या अमृतवाहिनी विद्यापीठाने आपल्या भविष्यवेधी शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. विद्यापीठात बी.टेक. आणि एम.टेक. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी या दोन नवीन अभ्यासक्रमांचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी कॉस्मेटिक क्षेत्रातील उच्च शिक्षण, संशोधन, रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

जाहिरात

या कार्यक्रमाचे उद्घाटन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त व सचिव सौ. शरयू देशमुख, विश्वस्त श्री. अनिल शिंदे, ॲडमिनिस्ट्रेशन हेड डॉ. एस. के. निंबाळकर, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. आर. बी. सातपुते, रिसर्च हेड डॉ. जे. बी. गुरव, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे डीन डॉ. एम. जे. चव्हाण तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले. यानिमित्ताने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच नियमित शैक्षणिक कार्यास प्रारंभ झाला.

जाहिरात

यावेळी स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसचे डीन डॉ. एम. जे. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाचे स्वरूप, त्यातील शैक्षणिक संधी आणि भविष्यातील करिअरच्या विविध पर्यायांची माहिती दिली. ॲडमिनिस्ट्रेशन हेड डॉ. एस. के. निंबाळकर यांनी १९७८ पासून सुरू झालेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत संस्थेने केलेली प्रगती आणि अमृतवाहिनी विद्यापीठाच्या स्थापनेमागील संकल्पना व प्रवास त्यांनी विशद केला.

जाहिरात

रजिस्ट्रार डॉ. आर. बी. सातपुते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सध्याच्या काळात सौंदर्यप्रसाधनांच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कॉस्मेटिक इंडस्ट्री ही वेगाने विकसित होणारी उद्योगशाखा आहे. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कॉस्मेटिक उत्पादनांची निर्मिती, संशोधन व विकास, गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक उत्पादन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होतील. आगामी काळातही विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्तारासाठी आधुनिक व उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त व सचिव सौ. शरयू देशमुख यांनी पालकांनी अमृतवाहिनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अमृतवाहिनी विद्यापीठाच्या स्थापनेमागील संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष साकार झालेल्या स्वप्नापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. एखादे शैक्षणिक स्वप्न केवळ संकल्पनेपुरते मर्यादित न ठेवता दूरदृष्टी, सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य नियोजन, सामूहिक योगदान आणि जिद्दीच्या बळावर ते वास्तवात उतरविता येते, याचे अमृतवाहिनी विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.गेल्या पाच दशकांपासून अमृतवाहिनी संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखली जात आहे. संस्थेचे विद्यार्थी शिक्षण, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, संशोधन, प्रशासन, व्यवसाय आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. या समृद्ध शैक्षणिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत डॉ. एस. के. निंबाळकर, डॉ. आर. बी. सातपुते, सरस्वती टीम तसेच डॉ. रोहित डुबे-पाटील यांचे विशेष योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विशेष परीश्रम घेतल्याचे सांगितले.

पुढील शैक्षणिक वर्षापासून बायोइंजिनिअरिंग हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असून, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगअंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML), सायबर सिक्युरिटी, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांसारखे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच स्कूल ऑफ बायोफ्युएल इंजिनिअरिंगअंतर्गतही नवीन शैक्षणिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील आहे. बदलत्या औद्योगिक आणि जागतिक रोजगार बाजारपेठेच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान, प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विद्यापीठाचा विशेष भर राहणार आहे.

अमृतवाहिनी विद्यापीठाचा उद्देश केवळ पदवी प्रदान करणे नसून ज्ञान, कौशल्य, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेच्या माध्यमातून सक्षम, आत्मनिर्भर व जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारी युवा पिढी घडविणे हा आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे तसेच स्वयंरोजगार व संशोधनासाठी प्रोत्साहन देणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

जाहिरात

या यशस्वी शैक्षणिक उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री व अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती ना. बाळासाहेब थोरात साहेब, संस्थेचे विश्वस्त मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, श्री. अनिल शिंदे आणि कार्यकारी विश्वस्त व सचिव सौ. शरयू देशमुख यांनी सर्व संबंधित अधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. महेश खताळ यांनी जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन प्रा. रुपाली दवंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. ए. बी. जगनर यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे