राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून श्रम, संस्कारा बरोबरच सामाजिक कर्तव्याची जाणीव- चैतालीताई काळे
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून श्रम, संस्कारा बरोबरच सामाजिक कर्तव्याची जाणीव- चैतालीताई काळे
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून श्रम, संस्कारा बरोबरच सामाजिक कर्तव्याची जाणीव- चैतालीताई काळे
कोपरगाव विजय कापसे दि ६ जानेवारी २०२५ – राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा प्रभाव केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर संपूर्ण समाजावर सकारात्मक ठरतो.त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होवून त्यांना समाजाच्या विविध समस्या कशा हाताळाव्यात याचे प्रात्यक्षिक राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मिळते. हिवाळी शिबीरामुळे विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय समस्यांवर प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी मिळते. त्यामुळे हे शिबीर केवळ विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भक्कम करण्याचे कार्य करत नाही, तर समाजात एक चांगला बदल घडवून आणण्यास मदत करून राष्ट्रीय सेवा योजना शिबीर श्रम,संस्काराबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देते असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले.
सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील मढी खु.येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीर विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विद्यार्थ्यांना कर्तव्य, सहकार्य, आणि जनसेवा याचे महत्त्व शिकवून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होवून विद्यार्थ्यांना समाजात चांगला नागरिक बनवण्याचा मार्ग मिळतो. विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी योग्य दिशा मिळते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. आज सोशल मीडिया प्रत्येकाची सगळ्यात मोठी गरज झाली असली तरी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा मर्यादित उपयोग करून सोशल मीडियाचा वापर कमी करावा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाला राष्ट्रासाठी काही तरी करायचे असते म्हणुन आपले व्यक्तिमत्व असे घडवा की, सगळ्यांमध्ये राहून स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करता आले पाहिजे यासाठी या शिबिराची शिदोरी पुढील आयुष्यात सोबत ठेवा असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, मढी खु.चे सरपंच सुनील भागवत, श्रीधर आभाळे,सोपानराव आभाळे,प्रकाश आभाळे, सुखदेव भागवत,सौ.सुजाता कुऱ्हाडे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, नामदेव गवळी, शंकर आभाळे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यातील मढी.खुर्द या ठिकाणी सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमदान शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ग्रामस्थांना विविध विषयांवरती मार्गदर्शन करणार आहेत यात प्रामुख्याने लिंगभाव संवेदनशीलता, जाणीवजागृती, लोकसंख्या नियंत्रण, जनजागृती,प्रधानमंत्री जनधन व विमा योजना,ऐतिहासिक स्थळ संवर्धन व स्वच्छता अभियान,पर्यावरण जैवविविधता व अधिवास संवर्धन, अन्न सुरक्षा जनजागृती, मृदा व जलसंवर्धन,अपारंपारिक उर्जा,जलस्रोत स्वच्छता व वृक्षारोपण,लोकशाहीतील सहभाग व मतदार जनजागृती असे सामाजिक विषय राबविले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भाऊसाहेब कांबळे यांनी दिली. प्रास्तविक व स्वागत प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी प्रा.विशाल पोटे यांनी आभार मानले.