अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस म्हणून मान्यता
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस म्हणून मान्यता
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस म्हणून मान्यता
संगमनेर विजय कापसे दि २२ जानेवारी २०२५– गुणवत्तापूर्ण शिक्षणाने व अद्ययावत सोयी-सुविधांमुळे देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाचे ऑटोनॉमस प्रस्तावास मान्यता देऊन पुढील दहा वर्षांसाठी स्वायत्तता बहाल केली आहे. याकरिता आवश्यक मान्यता या आगोदर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही दिलेली असून महाविद्यालयाच्या इतिहासात हा महत्वपुर्ण टप्पा आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश यांनी दिली.
स्वायत्तता मिळाल्याने विद्यापीठाच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांची ७०% प्रवेशाची मर्यादा न राहता महाराष्ट्रातील सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. यामध्ये अभ्यासक्रम रचना, परिक्षा पध्दती, मुल्यमापन या मुख्य बाबींवर स्वायत्तता प्राप्त झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयांचा समावेश दरवर्षी, वेळोवेळी करुन विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट वृध्दीसाठी मदत होणार आहे.
यापूर्वी अमृतवाहिनी महाविद्यालयातील पात्र विभागांना चार वेळा नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन, प्रथम ‘अ’ दर्जा आणि सध्या नॅकचा ‘अ प्लस’ दर्जा प्राप्त आहे. नॅक अ प्लस’ दर्जाप्राप्त महाविद्यालय असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयास प्रत्यक्ष समितीची भेट न देता केवळ मानांकनांच्या पात्रतेवर ही स्वायत्तता बहाल केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयास यापूर्वी कायम संलग्नता दिलेली असून दोन वेळा विद्यापीठातील सर्वोत्तम महाविद्यालय आणि दोन वेळा सर्वोत्तम प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबवलेल्या विविध योजना, टीचींग व लर्निंग पध्दत, आऊटकम बेसङ् शिक्षण यंत्रणा, संशोधन कार्य, पेटंट, ग्रांट, प्रोजेक्ट, गुणवत्ता धोरण, पी.एच.डी. धारक शिक्षकांची उपलब्धता, जपानी जर्मन भाषा प्रशिक्षण, डिजीटल लायब्ररी, तांत्रिक कार्यशाळा, उत्कृष्ठ शैक्षणिक निकाल, शैक्षणिक वातावरण आदी बाबींमुळे स्वायत्तता मिळणे सहज सोपे झालेले आहे.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट आणि त्याचे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी खास बाब म्हणून स्टार्टअप अॅण्ड इनोव्हेशन सेंटर सुरु केलेले असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या नवनिर्मितीस महाविद्यालय सहकार्य करत आहे. स्वायत्ततेमुळे शैक्षणिक दर्जा, नाविन्यपूर्ण सर्वकष उपक्रम व एकुणच विद्यार्थ्यांची रोजगार कौशल्य क्षमता वाढुन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत अमुलाग्र बदल होतील असे प्रतिपादन अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख यांनी केले. अभ्यासक्रम निर्मिती मागील संकल्पना व शास्त्र, संरचना, परिणाम आधारित शिक्षण पध्दती, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण प्रणाली यांची योग्य सांगड घालुन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करुन ध्येय्यपूर्ती करण्याची एक उत्तम संधी या स्वायत्ततेव्दारे मिळाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी सांगितले.
माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांच्या भविष्यवेधी दृष्टीकोनातून व मार्गदर्शनातून अमृतवाहिनी देशातील उच्च शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या थेट कॅम्पस प्लेसमेंट मधून संधी यांमुळे पालक, विद्यार्थी यांमध्ये महाविद्यालय लौकीकास्पद ठरले आहे. प्रवेशाकरिता पालक व विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. तसेच आजपर्यंत २०२४ बॅचची कॅम्पस प्लेसमेंट ८०२ झालेली असून मागील तीन वर्षात प्लेसमेंटचा उच्चांक ठेवण्यास व सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यास महाविद्यालय यशस्वी ठरले आहे.
या ऑटोनॉमस च्या मानांकनाबद्दल माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख, एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा व कॅन्सरतंज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अॅकेडेमिक डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा.व्ही.पी. वाघे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडे स्वायत्तता दर्जा मिळविण्यासाठी समन्वयक म्हणुन यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विष्णु वाकचौरे, संगणक विभागाच्या डॉ. स्वाती भोंडे व अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. भारत बोरकर यांनी काम पाहिले.
अमृतवाहिनी ऑटोनॉमसचे फायदे :
- औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम.
- नामांकित व सर्वोत्तम कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या दृष्टीने अभ्यासक्रमात दरवर्षी बदल होणार.
- कंपन्यांमध्ये इंटर्नशीपच्या माध्यमातून कौशल्ये वृध्दींगत होणार व सद्यस्थितीतील प्लेसमेंट मध्ये वाढ होणार.
- गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी, सर्वोत्तम शिक्षण प्राप्त होणार.