माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून स्वाधार योजना तालुका पातळीवर सुरू- प्रा बाबा खरात
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहाचा खर्च मिळणार
संगमनेर विजय कापसे दि २१ जानेवारी २०२५—काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर लागू झाली असल्याची माहिती आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रा. खरात म्हणाले की, ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहास प्रवेशास पात्र असूनही वस्तीगृह प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू झाली असा शासनाचा २६ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश निघाला असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लागू करण्यात आला आहे.
ही योजना तालुकास्तरावर लागू करावी यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने आदिवासी विभाग व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता याचबरोबर आमदार सत्यजित तांबे व प्रा बाबा खरात यांनीही या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वस्तीगृहाच्या प्रवेशासाठी अकरावी व बारावी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50% मार्क असावेत व त्याने प्रवेश घेतलेली संस्था स्वतःच्या तालुक्यातील नसावी तसेच पाच किलोमीटर परिसरातील त्या तालुक्याच्या हद्दीतील व नगरपालिका असावीत. असा नियम आहे .त्यामुळे जे विद्यार्थी वस्तीग्रहाच्या प्रवेशापासून वंचित राहत होते या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या अंतर्गत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेमधून त्यांच्या खात्यावर थेट निवास व भोजन व्यवस्थेचा खर्च वर्ग होणार आहे यामुळे राज्यभरातील लाखो मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याचा मोठा लाभ होणार आहे.
याबाबत जे विद्यार्थी या योजनेत पात्र आहेत मात्र त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांनी अधिक माहिती करता समाज कल्याण विभाग सावेडी अहमदनगर तसेच शासकीय मागासवर्गीय मुला मुलींची वस्तीगृह संगमनेर यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तालुकास्तरावरील स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा बाबा खरात व यशोधन कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही योजना लागू झाल्यामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील वस्तीगृहापासून वंचित राहिलेले अनेक विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याने या सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.