भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघपणे वाटचाल करीत आहे. – ना.विखे पाटील

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघपणे वाटचाल करीत आहे. – ना.विखे पाटील
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघपणे वाटचाल करीत आहे. – ना.विखे पाटील

Rahata vijay kapse दि १४ एप्रिल २०२६– भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघपणे वाटचाल करीत आहे. कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधान हा ग्रंथच आम्हाला श्रेष्ठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय करून, या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. मुकुंदराव सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गोडकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, मोहनराव सदाफळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकाळे, उपाध्यक्ष प्रदीप बनसोडे, सचिव बाळासाहेब कोळगे, कैलास सदाफळ, नितीन कापसे, मुन्नाभाई शहा, रघुनाथ बोठे, सोपानराव सदाफळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार सतीश वैजापूरकर, पंकज पिपाडा, सुनील सदाफळ, प्रा. बाळासाहेब गाडेकर, माधव बिडवे, बाळासाहेब गिधाड, हाजी बालमभाई पापाभाई सय्यद, दत्तात्रय पिलगर आणि भानुदास गाडेकर यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शेवटच्या घटकांसाठी काम करण्याचा दिलेला विचार बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असल्याचे समाधान व्यक्त करून, मंत्री विखे पाटील म्हणाले की, भारतामध्ये ज्या महापुरुषांनी समाजातील शोषित, वंचित घटकांसाठी पराकोटीचा संघर्ष केला, यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान हे प्रथमस्थानी आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होतेच, पण यापेक्षाही शोषितांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आणण्यासाठी कराव्या लागलेल्या क्रांतीचे ते एक जनक होते.
संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचे मोठे काम झाले आहे. मात्र केवळ राजकीय हेतूने संविधान बदलण्याच्या नकारात्मक चर्चा जाणीवपूर्वक सुरू केल्या जातात. परंतु संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय केला. यापूर्वी असा निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याला करता आला नव्हता.
देशातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना कायद्याने अधिकार देण्याचे ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ संसदेमध्ये मंजूर झाले आहे. देशातील महिलांच्या दृष्टीने हा अतिशय ऐतिहासिक क्षण आहे. महिलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी डॉ. आंबेडकर यांनी मांडला होता तोच विचार या विधेयकाच्या माध्यमातून अनेक दशकांनंतर कृतीत उतरत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकाळे यांनी केले.



