भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकातून कृतीत- ना. राधाकृष्ण विखे पाटील

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकातून कृतीत- ना. राधाकृष्ण विखे पाटील
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
Loni vijay kapse दि १४ एप्रिल २०२६–देशातील महिलांना समान सामाजिक व कायदेशीर अधिकार मिळावेत म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला विचार ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकातून कृतीत उतरत असल्याचा अभिमान जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त लोणी खुर्द आणि बुद्रुक गावांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, चेअरमन नंदूशेठ राठी, सरपंच कल्पना मैड, व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठ, अशोकराव धावणे, विजय लगड, अनिल ब्राह्मणे, अनिल विखे, वाय.बी.ब्राह्मणे, मायकल ब्राह्मणे, दादासाहेब घोगरे, संजय आहेर, डॉ.सुनील आहेर, संतोष ब्राह्मणे यांच्यासह जनसेवा युवक मंडळ, लोणी बुद्रुक आणि खुर्द येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, “संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांप्रमाणे आज देशाची वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचे निर्णय पाहिले तर, सामाजिक समरसतेचे काम सुरू आहे. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल सुरू आहे. समाजातील शेवटचा माणूस विकासाच्या प्रवाहात यावा म्हणून आपल्या संपूर्ण वाटचालीत डॉ.आंबेडकरांनी दीन-दलित, शोषित आणि वंचित घटकांच्या न्याय-हक्कासाठी संघर्ष केला. म्हणूनच त्यांची ओळख ‘सामाजिक क्रांतीचे जनक’ अशी झाली.

शिक्षणाने माणसाची वैचारिक शक्ती वाढेल; शिक्षणाने माणूस समृद्ध झाला तरच माणसाचे मन आणि चारित्र्यसुद्धा सुसंस्कृत होईल, असा संदेश त्यांनी दिल्यामुळे सामाजिक दरी कमी होण्यास मदत झाली. महिलांच्या न्याय-हक्कांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली, त्याला अनेक दशकांनंतर आता यश येत आहे. केंद्र सरकारने ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक लोकसभेमध्ये आणून महिलांना विकासाच्या प्रक्रियेत सहभाग देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागेसुद्धा डॉ. आंबेडकर यांचाच विचार आहे.”
“जातीभेदाच्या विरोधात डॉ. आंबेडकरांचे ठाम मत होते. त्याविरोधात त्यांनी सामाजिक क्रांती केली. संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंघ ठेवण्याचे काम झाले,” असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देश यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. संविधान बदलाची चर्चा करून विरोधक फक्त राजकारण करीत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.



