वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोपरगावची ‘समता सहकारी वारकरी बँक;
वारकऱ्यांच्या पैशांची व वस्तूंची सुरक्षितता, रेनकोट वाटपामुळे समाधानाचा वर्षाव

कोपरगाव विजय कापसे दि २३ जुन २०२५- कोपरगाव शहर प्रतिनिधी: पंढरपूरच्या वारीकडे जाणाऱ्या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था पुढे आली असून, ‘समता सहकारी वारकरी बँक’ या अभिनव संकल्पनेद्वारे वारकऱ्यांच्या पैशांची आणि इतर आवश्यक वस्तूंची जबाबदारी संस्थेने स्वेच्छेने घेतली आहे.

परम पूज्य विष्णू महाराज केंद्रे यांनी वारकऱ्यांच्या वस्तू व पैशांची जबाबदारी कोणीतरी घ्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमधील समता पतसंस्थेने पंढरपूरच्या मार्गावर वारकऱ्यांना अत्यावश्यक वेळेस त्यांच्या जमा केलेल्या वस्तू आणि रक्कम दिली जाईल, अशी सुविधा सुरू केली आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सेवेसाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही. उलट, एक दिवस जरी पैसे जमा राहिले, तरी ८% व्याजासह ती रक्कम परत दिली जाते, अशी माहिती समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली. या उपक्रमाचे राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले आहे.

याचबरोबर, वारकऱ्यांना ऊन, पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेनकोट वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमाची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, कार्याध्यक्ष सुधीर डागा, आणि उपाध्यक्ष चांगदेव शिरोडे यांनी दिली. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना प्रवासात बसण्याची आणि हवामानाचा त्रास टाळण्याची मोठी मदत झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘समता सहकारी वारकरी बँक’ उपक्रम आळंदीपासून पंढरपूरपर्यंत अखंड सुरु असून, दिंडी क्रमांक ४३ मध्ये सहभागी असलेल्या विष्णू महाराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या अभिनव सामाजिक उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुरक्षिततेचा विश्वास दिसून येत आहे. समाजसेवेचा हा आदर्श घालून देणाऱ्या सर्व संस्थांना वारकऱ्यांकडून विशेष धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत.




