घुलेवाडी महाराज अभंगावर बोला म्हणून उपस्थितांकडून विनंती तर विनंती करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल
घुलेवाडी महाराज अभंगावर बोला म्हणून उपस्थितांकडून विनंती तर विनंती करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल
घुलेवाडी महाराज अभंगावर बोला म्हणून उपस्थितांकडून विनंती तर विनंती करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल

संगमनेर दि १७ ऑगस्ट २०२५- घुलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात, शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनात संग्राम बापू सातत्याने राजकीय विधाने करत होते, त्यावर उपस्थितांनी ‘महाराज आपण अभंगावर बोला’ असे सांगितले त्यानंतर चिडलेल्या महाराजांनी विनंती करणाऱ्याला सायको म्हटले व त्यातून वाद उफाळून आला, याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्थानकात 14 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर घटनाक्रम असा की, घुलेवाडी येथे काल संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाराज सातत्याने या कीर्तनात हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण होईल अशी विधाने करत होते, त्यावर उपस्थितांमधून वारंवार महाराज आपण अध्यात्मावर बोला असे सांगण्यात आले. अखेर कीर्तन ऐकणाऱ्या निलेश गायकवाड यांनी महाराज अभंगावर बोला अशी विनंती त्यांना केली, त्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गावातील ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन हा गोंधळ शांत केला, मात्र महाराजांनी अचानक प्रश्न विचारणाऱ्या गायकवाड यांना उभे करून, अभंग गाऊन दाखव असे सांगितले त्यावर गायकवाड यांनी महाराज मी श्रोता आहे असे म्हटले. मात्र त्यानंतर महाराजांनी तू सायको आहे तुझे मानसिक संतुलन बिघडलेले आहे असे विधाने करायला सुरुवात केली. त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी उभे राहत महाराज तुम्ही अध्यात्मावर बोललं पाहिजे, असं म्हणायला सुरुवात केली, त्यानंतर गोंधळ निर्माण झाला आणि मध्येच कीर्तन थांबले. विरोधानंतर महाराज निघून गेले, वातावरण ही शांत झाले, मात्र त्यानंतर पुन्हा भंडारे महाराजांचे समर्थक असलेले काही कार्यकर्ते तिथे आले व त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. उपस्थित महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली, घोषणा देऊन, महिलांच्या अंगावर टोप्या फेकण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला.

या घटनेनंतर घुलेवाडी येथील स्वरूप राऊत यांनी पोलीस स्टेशनला जाऊन 14 जणांविरोधात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत महाराजांवर जीवघेणा हल्ला झाला, त्यांची गाडी फोडली, काचा फोडल्या असे म्हटले गेले. प्रत्यक्षात तिथे असे काहीही घडलेले नव्हते.
दरम्यान धार्मिक व्यासपीठावरून राजकारण करण्याची वृत्ती सध्या वाढत आहे, राजकीय अजेंडा पेरण्यासाठी अनेक मंडळी कीर्तनांचा वापर करतात त्यातून या परंपरेला मोठे गालबोट लागलेले दिसते. कायद्याचा वापर करून, खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संगमनेरात वाढलेला आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींनी यावेळी घुलेवाडीत कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली, महाराजांनी अध्यात्माचा विचार सांगायला हवा त्यांनी राजकारणात पडू नये अशी भूमिकाही काहींनी मांडली.

पोलिसांवर दबाव कोणाचा?
दरम्यान भंडारे महाराज यांनी देखील आपली बाजू मांडण्यासाठी प्रकाशित केलेल्या व्हिडिओत, गाडी फोडली, जीवघेणा हल्ला झाला अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख केलेला नाही, असे असताना पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून हा खोटा गुन्हा दाखल करून घेतला असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे?
घुलेवाडी अशांत करण्याचा प्रयत्न
घुलेवाडी हे अठरापगड जातींचे आणि विविध धर्मीयांचे निवासस्थान आहे, आजवर कायम गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या गावाच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आहे. धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवून येथील सलोखा संपुष्टात आणण्याचा डाव काही मंडळींनी आखलेला आहे.



